घरमहाराष्ट्र"मातोश्री"वर शिवसैनिकांचा पहारा; राणा दाम्पत्याला रोखण्याची तयारी  

“मातोश्री”वर शिवसैनिकांचा पहारा; राणा दाम्पत्याला रोखण्याची तयारी  

Subscribe

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या घरी जाऊन कलम १४९ अन्व्ये नोटीस बजावली. मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचे  खासगी निवासस्थान असून या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आणि इतर अतिमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसेच याठिकाणी नेहमीच वर्दळ असते.

मुंबई : सध्या राज्यात सुरु असललेला मशिदींवरील भोंगा  आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा पठणाचा वाद आता वेगळ्याच वळणावर आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आज, शनिवारी “मातोश्री” समोर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर दाखल होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या घरी जाऊन कलम १४९ अन्व्ये नोटीस बजावली. मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असून या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आणि इतर अतिमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसेच याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. तसेच धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने असे कार्यक्रम फक्त आझाद मैदानात करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात आंदोलन अथवा निषेध करू नये. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस खेरवाडी पोलिसांकडून राणा दांपत्याला बजावण्यात आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर  हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक झाले.  त्यांनी राणा  दाम्पत्याला अमरावतीमध्येच रोखण्याचा इशारा दिला होता.  मात्र आज  सकाळी राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी सकाळी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा पुनरुच्चार केला.
मात्र त्यानंतर तातडीने शिवसैनिक मातोश्रीवर जमा झाले. “महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे  नाव घेत वारंवार मते  मागितली आहेत. पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करत आहेत. राज्यातील सत्ता मिळताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत,” असे  रवी राणा यांनी सांगितले.
दरम्यान मातोश्री बाहेर शिवसैनिकांसोबत पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. यावेळी राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी केली जात होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी ४.३० वाजता शिवसैनिकाना सामोरे जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही शिवसैनिक मातोश्रीवर ठाण मांडून होते. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता ठाकरे यांनी शिवसैनिकांनी घरी जाण्याची सूचना केली. मात्र तरीही शिवसैनिक घरी जाण्यास तयार नव्हते. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही तुम्हाला एकटे सोडून जाणार नाही, असे शिवसैनिकानी  सांगितले. रात्री उशिरा  शिवसैनिकांची भेट घेऊन मुख्यमंत्री ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे गाडीत बसून वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा जागता पहारा 

मातोश्री  बाहेर आज शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी सेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, युवा सेना अध्यक्ष वरुण सरदेसाई हजर होते. राणा दाम्पत्य हूल देऊन रात्रीच मातोश्रीबाहेर येऊ शकतात. त्यामुळे शिवसैनिक येथे जागता पाहरा देणार आहेत, असे मुबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -