ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही- हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असल्याने ते चौकशीला हजर राहणार की नाही, यावरून चर्चेला उधाण आले होते.

hasan mushrif

गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे आमदार हसन मुश्रीफ नुकतेच कागलमधील त्यांच्या निवासस्थानी हजर झाले आहेत. हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असल्याने ते चौकशीला हजर राहणार की नाही, यावरून चर्चेला उधाण आले होते. आज अखेर हसन मुश्रीफ यांनी स्वतः समोर येऊन यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार हसन मुश्रीफ हे नुकतेच कागलमधील त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ईडीकडून मिळालेल्या समन्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “ईडीचे काही अधिकारी माझ्या निवासस्थानी येऊन गेले, त्या दिवशी मी हजर नव्हतो. दोन दिवस मी बाहेर होतो. पण माझ्या कुटुंबीयांची अवस्था मी टीव्हीवर पाहिली. ते पाहून मी माझ्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी घरी आलो आहे. ” असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

यापुढे बोलताना त्यांनी ईडीकडून मिळालेल्या समन्सवर आपली भूमिका स्पष्ट केली. “पहिल्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्याप्रकरणी मला समन्स बजावण्यात आलाय. या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. पण ईडीला उत्तर देताना मी तसं सांगणार आहे. त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू.” असं देखील मुश्रीफ म्हणाले.

“सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. जवळपास चार लाख लोकांनी माझ्यावर आमदार म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा मी चेअरमन आहे. इतरही काही संस्थांची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यात ३१ मार्च येतोय. त्यामुळे बॅंकेची अनेक महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात. हे सर्व पाहता महिन्याभराची मुदतवाढ मिळावी, यासाठी वकिलाच्या माध्यमातून विनंती करणार आहे.”, असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले.