मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनो सावधान, ही बातमी वाचा!

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लक्झरी बसवर गोळीबार, दगडफेक करण्यात आली आहे. तर, बेदम मारहाणही करण्यात आली आहे.

mumbai goa highway

मुंबई गोवा महामार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. रस्तेमार्गे खासगी वाहनातून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणे आता जीवावर बेतू शकणार आहे. कारण, दापोलीहून बोरीवलीत येणाऱ्या खासगी वाहनांवर दगडफेक, गोळीबार झाला असून प्रवाशांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत. हा थरार पहाटेच्या वेळेस झाला असून लुटारूंनी अबालवृद्ध प्रवाशांना बेदम मारहाण केली आहे.

पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर काही अवैध व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यामुळे तीस-पस्तीस जणांच्या टोळीने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक केली. एवढंच नव्हे तर बसवर गोळीबारही करण्यात आला.

हेही वाचा – ‘या’ प्रकल्पांच्या विरोधात कोकणवासी आक्रमक; जनविकास समितीच्या मेळाव्यात निर्धार

लक्झरी बसमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही प्रवास करत होते. या सर्वांना बेदम मारहाण करण्यात आली. चार ते पाचजण एक-एकाला मारत होते. तर मारहाणीतून सोडवायाला गेलेल्या प्रवाशांचे दागिने लुटण्याचाही प्रयत्न करण्यात आला. लुट झाल्याने लक्झरीमधील प्रवासी बराच वेळ तिथेच थांबून होते. हे प्रवासी दापोलीहून बोरवीलला जात होते. मात्र, हा प्रवास त्यांच्यासाठी असुरक्षित ठरला आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे कोकणवासिय सातत्याने याप्रकरणी आवाज उठवत असतात. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे  होत असते. त्यातच, आता असे लुटीचे प्रकार घडत राहिल्यास या मार्गावरून प्रवास करणे चाकरमान्यांसाठी जीवावर बेतू शकतं, त्यामुळे या मार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.