घरमहाराष्ट्र'जय भीम'ची पुनरावृत्ती; कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात १३ वर्षांनी हत्येचा खटला

‘जय भीम’ची पुनरावृत्ती; कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात १३ वर्षांनी हत्येचा खटला

Subscribe

 

मुंबईः घाटकोपर येथे २००९ मध्ये झालेल्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा खटला चालवण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाला दिले आहेत. बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपट ‘जय भीम’च्या कथेप्रमाणे ही घटना घडली आहे.

- Advertisement -

पोलीस उप निरीक्षक संजय एस. खेडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ व्ही. कोळेकर, पोलीस नाईक सयाजी एस. ठोंबरे अशी या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या तिघांनी २४ एप्रिलला न्यायालयासमोर हजर रहावे. न्यायालयाने या तिघांविरोधात हत्येचा आरोप निश्चित करावा. तसेच अन्य कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवता येईल का, हेही न्यायालयाने तपासावे. याचा खटला एक वर्षाच्या आत संपवावा, असे आदेश न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

याप्रकरणी मेहरुनिसा कादिर शेख यांनी न्यायालयात याचिका केली होती. स्वच्छेने दुखापत करणे, कट रचणे व बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे या गुन्ह्यासाठी या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने ३ जानेवारी २०१८ रोजी अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकारी यांना दिले होते. या आदेशाला मोहसिन शेख यांनी याचिकेत आव्हान दिले होते.

- Advertisement -

माझा मुलगा अल्ताफ कादिर शेखचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे त्याचा कोठडीत मृत्यू झाला आहे. यासाठी या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून खटला चालवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

ही घटना ११ सप्टेंबर २००९ रोजी घडली. पहाटे ४ वाजता पोलीस अल्ताफच्या घर पोहोचले. घरी पोलिसांनी त्याला मारहाण केली. नंतर त्याला घाटकोपर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याला कोठडीत ठेवण्यात आले. सकाळी ९ च्या सुमारास पोलीस अल्ताफला उठवायला गेले. तो उठला नाही. त्यामुळे त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

पुढे जाऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने या तिन्ही पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवला. नंतर सीबीआयने विशेष न्यायालयाने हा खटला अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केला. मात्र पोलिसांनी केलेला पंचनामा संशयास्पद आहे. पोलीस कोठडीत अल्ताफचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अंगावर जखमा आहेत. विशेष सीबीआय न्यायालयाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मेहरुनिसा शेख यांचे वकील युग चौधरी यांनी न्यायालयात केली होती.

याला राज्य शासनाच्यावतीने विरोध करण्यात आला. अल्ताफ ड्रग्जचे सेवन करायचा. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो दारु प्यायला होता. ड्रग्जचे अति सेवन झाल्यामुळे अल्ताफचे निधन झाले, असा दावा राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला. न्या. प्रकाश नाईक यांनी हा दावा फेटाळून लावत पोलिसांविरोधात हत्येचा खटला चालवण्याचे आदेश दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -