मलाही गृहमंत्री व्हायचे होते, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खदखद

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे अर्थ खातेदेखील होते. निधी वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिल्याचे आरोप अजित पवारांवर शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून वारंवार करण्यात आले.

ajit pawar

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे अर्थ खातेदेखील होते. निधी वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिल्याचे आरोप अजित पवारांवर शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून वारंवार करण्यात आले. तरी अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या काळात अत्यंत काटकसरीने निधीचे वाटप करीत राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकला.

प्रत्यक्षात मात्र पवारांना अर्थ खात्याऐवजी गृह खात्यात जास्त रस होता, हे खुद्द त्यांनीच गुरुवारी एका कार्यक्रमात सांगितले, परंतु माझ्याकडे गृहखाते आले तर हा कुणाचेच ऐकणार नाही असे वाटत असल्यानेच मला गृहखाते मिळाले नसल्याचे अजित पवार म्हणाले.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणी बैठकीत व्यासपीठावरील एका पदाधिकार्‍याने अजित पवारांना आपले सरकार आले की तुम्ही गृहखाते घ्या, असा सल्ला दिला. त्यावर अजित पवार यांनी त्यांना मिश्कीलपणे उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, ५ वर्षांपूर्वी मला उपमुख्यमंत्री केले तेव्हा मी वरिष्ठांना म्हटले होते की माझ्याकडे गृहखाते द्या, पण वरिष्ठांना वाटले की याच्याकडे गृहखाते दिले तर आपले कोण ऐकणार? हे खरे आहे.

मला गृहखाते दिले तर मला योग्य वाटेल तेच करणार. सगळ्यांना समान न्याय. राष्ट्रवादीचा जर कोणी चुकला आणि मला कोणी सांगितले की दादा याला पोटात घ्या, पण मी कुणालाही पोटात घेत नाही. सगळ्यांना नियम सारखेच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी जीवाचे रान करेन, पण चुकला तर त्यांच्यावर पांघरूण घालणार नाही, असे म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला.

पहिल्यांदा अनिल देशमुखांना हे खाते मिळाले. त्यांच्याकडून हे गृहखाते गेल्यावर म्हटले होते की आता तरी द्या. त्यानंतर ते खाते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गेले. वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर बोलता येत नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.