Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही

…तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही

राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनचे परिणाम चांगले आणि वाईट होत असले तरी गरज पडली, तर लॉकडाऊन लावावाच लागेल, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व यंत्रणांशी चर्चा करत असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीच्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनचे परिणाम सरकार जाणून आहे. ते होऊ नये, म्हणून लोकांनीही सजग राहिले पाहिजे. पण तसे दिसत नाही. याही परिस्थितीत निर्बंध लागू केले जात आहेत. पण तेवढ्याने संकट थांबले तर लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही, सध्या निर्बंध कडक करण्यावर भर दिला जाईल. मात्र, लोकांच्या वर्तनामुळे सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईत सध्या सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळे तिथली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यात येत असल्याचे टोपेंनी सांगितले. मुंबईत एक-दोन वगळता हॉस्पिटलची कमतरता नसल्याचेही टोपेंनी स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी राजेश टोपेंनी लसीकरणासंदर्भातही भाष्य केले. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी वन बूथ, टेन यूथप्रमाणे तरुणांना विश्वासात घेऊन 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, हात स्वच्छ धुत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असा पुनरूच्चारही राजेश टोपेंनी केला.

सुट्टीकाळातही लसीकरणाचा निर्णय
देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य घेत केंद्राने सुट्टीकाळातही कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटची त्रिसूत्री राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक आहे, तिथे दोन आठवड्याचा लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या लसीकरणासाठी राज्यांना मुबलक लसींचा वेळेवर पुरवठा केला जाईल, असेही केंद्राने म्हटले आहे. लसीकरणाची मोहीम जरी वेगाने पुढे नेत असलो, तरी लसीचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही केंद्राने दिली आहे. गुड फ्रायडे, ईस्टर, गुढीपाडवा, बैसाखीसारख्या एप्रिल महिन्यातील विविध सणांच्या दिवशीही लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार ; सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता – महापौर किशोरी पेडणेकर

- Advertisement -

 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबई डेंजर झोनमध्ये आली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उद्यापासूनच कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसेच, सामान्य प्रवाशांना ट्रेन प्रवास करणे बंद केले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसाला कोरोनाचे ५ ते ६ हजार रुग्ण आढळून येत असून ही संख्या १० ते २० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत गेल्या रविवारपासून रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता रात्री ८ नंतर मुंबईत हॉटेल्स, दुकाने, फेरीवाला व्यवसाय आदी बंद करण्यात येत आहेत. मात्र रात्री ते सकाळपर्यंत जरी कोरोना वाढू नये म्हणून काळजी घेतली जात असली तरी दिवसभरात ट्रेन, बस, मार्केट आदी ठिकाणी गर्दी होत असते. त्यामुळे लोकांची बेफिकिरी वाढत जाऊन गर्दी आणखीन वाढते आहे. परिणामी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरीलप्रमाणे शक्यता वर्तवली आहे.

कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता

वाढत्या गर्दीला आणि कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे बंद केली जातील. त्याचप्रमाणे गर्दीची ठिकाणे असलेले थिएटर, मॉल हेसुद्धा बंद केले जातील. ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास बंदी करण्यात येईल. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल. खासगी कार्यालयात दोन शिफ्टमध्ये आणि ५० टक्के उपस्थितीत काम करणे बंधनकारक केले जाऊ शकते. दुकानात होणारी गर्दी रोखण्यासाठी दुकाने एक दिवस आड उघडण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले.

कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईकच करतील अंत्यसंस्कार

कोरोना रुग्ण घरामध्ये उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबियच अंत्यसंस्कार करतील, असा नियम पुणे महापालिकेतर्फे आखण्यात आला आहे. कुटुंबियांनी सर्व नियमांचे पालन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे. तसेच त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकांनीच पूर्ण करावी, असेही पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेतर्फे केवळ गाडीची सुविधा पुरवली जाईल, असे समजते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तताही नातेवाईकांनाच करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना ४ए प्रमाणपत्र आणि फॉर्म २ भरावे लागतील. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील सदस्यांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मृतदेह ठेवण्याकरता बॉडी बॅग आणि चार पीपीई किट देण्यात येतील. कुटुंबातील चार सदस्यांनी या पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार करायचे आहेत. पीपीई किट परिधान करून मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवणे. त्यानंतर मृतदेह गाडीमध्ये ठेवणे आणि स्मशान भूमीतील इतर संपूर्ण प्रक्रिया घरातील सदस्यांनाच पार पाडावी लागणार आहे. मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी गाडीची सोय करण्यात येणार असून त्यासाठी पुणे महापालिकेला संपर्क करावा लागणार आहे.

- Advertisement -