घरमहाराष्ट्रIndic Tales : सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा.... भुजबळांचा...

Indic Tales : सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा…. भुजबळांचा इशारा

Subscribe

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ (Indic Tales) आणि ‘हिंदू पोस्ट’ (Hindu Post) या वेबसाइटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी कडक कारवाई झाली नाही तर, आणखी तीव्र आंदोलन महाराष्ट्रात करू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

इंडिक टेल्स या वेबसाइटवर पुनर्मांडणीच्या नावाखाली इतिहासाची अक्षरश: मोडतोड सुरू आहे, असे म्हणत मराठी अभिनेता ओमकार गोवर्धन याने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे आज भेट घेऊन केली.

- Advertisement -

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना केली आहे. मुंबई पोलिसांनी अनेक प्रकरणात काही तासात कारवाई केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात देखील लक्ष घालून कडक कारवाई केली पाहिजे जर कडक कारवाई झाली नाही तर यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रात करू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

- Advertisement -

यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. शरयू फौंडेशन ट्रस्ट नावाची संस्था ही “इंडिक टेल्स” ही वेबसाइट चालवते. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. त्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे भुजबळ म्हणाले.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाइटवरील लेख “मुखरनीना’ या नावाखाली ‘नीना मुखर्जी’ यांनी पोस्ट केल्याचे दिसत असून या लेखाचे क्रेडीट हे भारद्वाज नावाच्या व्यक्तीस दिले गेले आहे. या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून थ्रेडस (लेख) रुपात या वेबसाइट वर पोस्ट केल्या गेल्या आहेत. या भारद्वाज व्यक्तीचे ट्विटर थ्रेड्स तपासले असता, त्याने महात्मा गांधींपासून इतर अनेक महनीय व्यक्तींपर्यंत आक्षेपार्ह व एककल्ली लिखाण केले असल्याचे दिसते. तसेच सर्व संबंधित लोकांचे आणि संस्थेचे प्रोफाईल सुद्धा पत्रासोबत जोडण्यात आले आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -