घरमहाराष्ट्रIrshalwadi landslide : मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 16 जणांचा मृत्यू, 98...

Irshalwadi landslide : मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 16 जणांचा मृत्यू, 98 जणांना वाचवलं

Subscribe

Irshalwadi landslide : रायगडच्या (Raigad) खालापूर जवळील  (Khalapur) इर्शाळगडाच्या (Irshalgarh) पायथ्याशी इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने (Irshalwadi landslide) अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. आज सकाळपासून एनडीआरएफ पथकाकडून सुरू असलेल्या  बचाव कार्यात आतापर्यंत 98 जणांना वाचविण्यात यश आले असून 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. परंतु मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले असून उद्या (21 जुलै) पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्याला सुरूवात होणार आहे. याबाबत एनडीआरएफने माहिती दिली आहे. (Irshalwadi landslide Heavy rain halts rescue operations in Irshalwadi 16 people died 98 people were saved)

हेही वाचा – इर्शाळगड दरड दुर्घटना : शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वाटप, भुजबळांनी दिली माहिती

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकामी दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या, मात्र बुधवारी रात्री खालापूर जवळील इर्शाळगडाच्या पायथ्याची असलेली इर्शाळवाडीवर दरड कोसळून भीषण दुर्घटना झाली. या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली 48 पैकी 17 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, तर 20 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी फक्त दहा घरं वाचू शकली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झालं होतं. पण मुसळधार पाऊस आणि अंधारामुळं बचावकार्याला सकाळीच सुरूवात झाली. आज दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मात्र अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – Irshalwadi landslide : इर्शाळवाडी येथे बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा रवाना

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत ठाण मांडून

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याशिवाय मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश बाल्दी मध्यरात्रीच घटनास्थळी पोहचले होते. मध्यरात्रीपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या. याशिवाय मंत्री उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर या दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा – Irshalwadi landslide : राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच इर्शाळवाडीबाबत केलेले विधान खरं ठरलं

अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर पालिकेचे बेलापूर येथील अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. मात्र इर्शाळवाडीतील घटनास्थळी पोहचत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -