घरमहाराष्ट्रIrshalwadi landslide : ...हेच दुर्घटनांचे कारण, ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Irshalwadi landslide : …हेच दुर्घटनांचे कारण, ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात सरकारचा धिंगाणा सुरूच आहे व त्यात भर म्हणून पावसानेही धिंगाणा घातला. त्या धिंगाण्यात महाराष्ट्रात अनेक निरपराध्यांना पुन्हा एकदा प्राण गमवावे लागले. बुधवारी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत पावसाच्या तुफानी वादळात दरड कोसळून प्रचंड मनुष्यहानी झाली. मुसळधार पावसात अशा दुर्घटना आणि अपघात घडत असतात व प्रत्येक पावसाळा हा अशा दरडी व डोंगरांखाली असंख्य लोकांचे प्राण घेत असतो. मुळात जनतेच्या सुरक्षेबाबत सुरू असलेली हेळसांड हेच अशा दुर्घटनांचे कारण आहे, असे सांगत ठाकरे गटाने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

हे असे वारंवार का होत आहे? जंगलतोड, डोंगरफोड हे खरे कारण आहे. त्यातूनच डोंगराच्या मातीची धूप होते व डोंगर खचतात. दरडी कोसळतात आणि निरपराध जीव त्याखाली गाडले जातात. राज्यकर्त्यांकडून पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य दिले जात नाही. जंगलतोडीपासून खनिज कर्म, उत्खननात आलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळणाऱ्या फायद्यापोटी आपण आपल्याच लोकांचे बळी घेत आहोत, अशी टीका शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

ढगफुटीपेक्षा पक्षफुटीकडे जास्त लक्ष
मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ इर्शाळवाडीतील दुर्घटनास्थळी धावले व मदतकार्य सुरू केले, पण प्रत्येक पावसात अशा दुर्घटना घडणारच हे माहीत असताना आधीच अशा वस्त्यांचे आणि गावांचे पुनर्वसन का केले जात नाही? हे दुर्घटनाग्रस्त डोंगर कोणत्या खात्याच्या अखत्यारीत येतात? त्या खात्याचा मंत्री कोण? अधिकारी कोण? हे जनतेला समजायला हवे, असे सांगतानाच, डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व वाड्या, वस्त्यांकडे लक्ष देण्याची गरज असताना सरकारे राजकारणात गुंतून पडतात. ढगफुटीकडे लक्ष देण्याऐवजी पक्षफुटीकडे जास्त लक्ष दिले जाते. त्याचा परिणाम हा असा जनतेला भोगावा लागतो, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

इतर सर्व अंदाज येत असताना…
इर्शाळवाडी गावात दरड कोसळली आहे, परंतु हा भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता तरीही दरड कोसळली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘‘भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहेत. जे दरडप्रवण क्षेत्र आहे तिथे दुर्घटना होत नाहीत, जे यादीत नसतात तिथे दुर्घटना होतात. सध्या हवामानाचा पॅटर्न बदललेला आहे. सध्या कमी दिवसांत जास्त पाऊस असा पॅटर्न पाहायला मिळत आहे. पावसाची टक्केवारी समानच असते, परंतु जो पाऊस महिना-सवा महिन्यात पडायचा तो पाऊस दोन-तीन दिवसांत पडत आहे. प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेणे कठीण जाते.’’ फडणवीस म्हणाले ते खरेच आहे, पण सरकारला इतर सर्व अंदाज येत असताना याच बाबतीत अंदाज मिळू नये याचे आश्चर्य वाटते, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे बळी
मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याने ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान हजारो प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून वाटचाल करीत असताना त्यातील एक योगिता शंकर या मातेची चार महिन्यांची मुलगी तिच्या आजोबांच्या हातून निसटली व पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. एका मातेने डोळ्यांदेखत आपल्या पोटचा गोळा वाहून जाताना पाहिला. काय आक्रोश त्या मातेने केला असेल? मुसळधार पावसाचे, सरकारी बेफिकिरीचे, अव्यवस्थेचे, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे हे बळी आहेत, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सरकारच्या संवेदनाही दरडीखाली चिरडून गेल्या
इर्शाळवाडी येथे दरड कोसळून निरपराध्यांचे जीव गेले. तरीही सरकार आणि व्यवस्था जागी होणार नसेल तर यापुढेही दरडी कोसळत राहतील. पाण्याच्या प्रवाहात माणसे वाहून जातील. सरकार फक्त तात्पुरती धावाधाव करेल, इतकेच! सरकारच्या संवेदनाही दरडीखाली चिरडून गेल्याचे हे लक्षण आहे. दरडीखालील आक्रोश आता तरी सरकारला ऐकू जाणार आहे का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -