सहा वर्षानंतर देवेन भारती साईड पोस्टिंगला; जयजित सिंग एटीएस प्रमुख

३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुख पदावरून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावरती सव्वा महिने कार्यरत होते.

जयजीत सिंग, देवेन भारती

मुंबईसह राज्य पोलीस दलात शुक्रवारी रात्री २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून देवेन भारती यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर तर जयजित सिंग यांना दहशतवात विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख नेमण्यात आले आहे. तसेच प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर नवल बजाज यांना आर्थिक गुन्हे शाखेत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. अखेर सहा वर्षानंतर देवेन भारती यांना क्रिम पोस्टवरून हटवून साईड पोस्टिंगला पाठवले आहे.

३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुख पदावरून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावरती सव्वा महिने कार्यरत होते. अखेर सव्वा महिन्यानंतर त्यांची केलेली बदली प्रत्यक्षात अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करण्यात आली. तर त्यांच्या बदलीने रिकाम्या झालेल्या जागेवर जयजित सिंग यांच्याकडे एटीएसच्या प्रमुख पदाचा पदभार दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एटीएस प्रमुख पद हे महत्त्वाचे पद असल्याने ती जागा रिकामी ठेवता येत नाही, असे गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच बदली झाल्यानंतरही देवेन भारती त्याच पदावर कार्यरत होते.

मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमक्यांचे फोन येत होते. अखेर एटीएसच्याच पथकाने पश्चिम बंगालमधून मुख्य आरोपीला अटक केली होती. दहशतवाद विरोधी पथक हे राज्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यांच्याच पथकाने मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीचा आरोपी पकडण्यात आला होता. देवेन भारती हे चार वर्षाहून अधिक काळ सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एक वर्षाहून अधिक काळ एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वांच्याच पदावर कार्यरत होते. त्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेन भारती यांची सहा वर्षानंतर ३ सप्टेंबर रोजी एटीएसमधून बदली केली. मात्र, बदली केल्यानंतर त्यांना नवीन पोस्टींग न दिल्याने ते तेथेच कार्यरत होते. अखेर आज, शुक्रवारी त्यांची अधिकृत बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करत त्यांना साईड पोस्टिंग दिल्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. त्यांच्या जागी आता जयजित सिंग हे पदाभार सांभाळतील.

अन्य बदल्यांमध्ये निकेत कौशिक हे आता सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर काम पाहातील. तर राजवर्धन यांना महिला अत्याचार प्रतिबंध विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पाठवले आहे. संजय मोहिते यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, तर एम. के. भोसले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मोटार परिवहन विभागात पाठवले आहे. अप्पर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर नवल बजाज यांना नव्याने पोस्टिंग देत अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे.

हेही वाचा –

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही