मुंबई फेस्टिव्हलमध्ये रावल यांचा २० कोटींचा भ्रष्टाचार – नवाब मलिक

NCP Spokesperson Nawab Malik
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

पर्यटन विभागांतर्गत मुंबईत भरवण्यात आलेल्या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून वीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. याप्रकरणी सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना मंत्र्यांच्या दबावापोटी कारवाई होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी नवाब मलिक धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नवाब मलिक पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांच्या काळात धुळे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेच्या काळात अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र भाजपचे सरकार आल्यापासून कामात अडथळा आणला जात आहे. त्या महापालिकेची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन, डॉ. भामरे आणि भ्रष्ट मंत्री जयकुमार रावल यांच्यावर भाजपकडून सोपवण्यात आली आहे. मात्र मंत्री रावल यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

रावल यांनी मुंबईत नुकताच मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल घेतला. या फेस्टिव्हलचे वर्षाचे टेंडर असताना मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे पाच वर्षांचा ठेका देऊन त्यात वीस कोटींचा भ्रष्टाचार केला. तोही कार्यकारी संचालक नसताना जॉइंट एमडी यांच्या काळात ठेक्याला मुदत देण्यात आली. संयुक्त सचिव आशुतोष राठोड यांच्या माध्यमातून मंत्री रावल भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.