जितेंद्र आव्हाडांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Jitendra Awhad

मुंबईः आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी एका अधिकाऱ्याचा विषय सभागृहात मांडला. त्याची दखल आम्ही घेतलेली आहे. आव्हाड व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाईल. लोकप्रतिनिधींना अशी धमकी दिली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आव्हाड यांची मुलगी आमच्याही मुलीसारखी आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

मात्र महेश आहेर यांची किमान बदली करावी. कारण त्यांच्या कार्यालयात ते पैसै मोजत असल्याचा व्हिडीओ आहे. त्याने काही अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केला.

त्यावर फडणवीस म्हणाले, सध्या तरी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता नाही. पण सीआयडीच्या तपासात काही तथ्य आढळल्यास याचा तपास निश्चित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केला जाईल.

जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट रचत असल्याचे संभाषण होते. या क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर यांच्या मदतीने शूटर तैनात केल्याचे या संभाषणात एका व्यक्तीने म्हटले होते. सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश असल्याचे बोलले जात होते. नंतर ऑडिओमधील व्यक्ती ही ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर असल्याचा दावा केला गेला. या ऑडिओ क्लिपनंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना  त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट चारच्या बाहेर बेदम मारहाण केली.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांत तक्रार केली. तसेच महेश आहेर यांनीही या मारहाणीची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. मात्र आव्हाड यांच्या तक्रारीचा गुन्हा न नोंदवल्याने आव्हाड व त्यांच्या मुलीने पोलीस तपासावर संशय व्यक्त केला. माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. आम्हाला सुरक्षा दिलेली नाही. तर महेश आहेर यांच्या तक्रारीची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला, असा आरोप आव्हाड यांच्या मुलीने केला होता.