घरठाणेKalyan Crime: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक; शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या...

Kalyan Crime: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक; शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या प्रकरणी कारवाई

Subscribe

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गोळ्या झाडल्या.

ठाणे: कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Kalyan Crime BJP MLA Ganpat Gaikwad arrested Action taken in case of shooting at Shiv Sena leader)

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश जगताप यांच्यासमोरच हा थरारक प्रकार घडला. जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

- Advertisement -

“माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली, त्यावेळी मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही,” असे त्यांनी सांगितलं. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा सवाल संतप्त विरोधक विचारत आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप-

या गंभीर घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले. जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली. त्याचवेळी माझ्यावर होणारा अन्याय मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितला होता. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. पक्षश्रेष्ठींनी माझी दखल घेतली नाही. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असे गंभीर आणि सनसनाटी आरोपही त्यांनी केले. तसेच “मी मागील 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागा मालकांना पैसे देऊनही ते सह्या करण्यास येत नव्हते. त्यानंतर आम्ही न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. केस जिंकून ज्यावेळी सातबारा आमच्या नावावर झाला, त्यावेळी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मी दोन दिवसांपूर्वीदेखील त्यांना विनंती केली होती की जबरदस्तीने तुम्ही ताबा घेऊ नका. न्यायालयात जा, तिकडून ऑर्डर आणा, न्यायालयाकडून जर ऑर्डर आणली तर तुमची जागा तुम्हाला देतो. पण त्यांनी दादागिरी सुरूच ठेवली. आज त्यांनी कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते” अशी माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री जवळपास 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले होते. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला”, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली.

महेश गायकवाड गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार, सहा गोळ्या शरीरात

या घटनेत शिवसेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

तणावाचं वातावरण, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त –

कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल 

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पोलिसांनी दोघांना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा: Kalyan Crime: होय, मीच केला गोळीबार..; आमदार गणपत गायकवाड यांची कबुली, म्हणाले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -