उद्यापासून ‘माय महानगर’ची ‘खरेंचे खोटे कारनामे’ मालिका; वाचा काय आहेत कारनामे…

नाशिक : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून झडत होती. परंतु, त्यांचे हात एवढ्या वरपर्यंत पोहोचलेले होते की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता मात्र खरेंचे खोटे कारनामे पुढे येत आहेत. या संदर्भात ‘माय महानगर’मध्ये बुधवार (दि. १७)पासून ‘खरेंचे खोटे कारनामे’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध होणार आहे. खरेंच्या कारनाम्यांसदर्भात पुराव्यांसह माहिती असल्यास ९९७५५४७६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

कैलास नागरी पतसंस्थेत संशयास्पद भूमिका

त्र्यंबक येथील कैलास नागरी पतसंस्थेत झालेला पाच कोटी ३४ लाखांचा अपहार दाबण्यातही सतीश खरे यांची महत्वाची भूमिका होती असे बोलले जाते. या अपहारात ऑडिट रिपोर्ट आणि चौकशी अहवालाचा ताळमेळच लागत नसल्याचे दिसून येते. शिवाय इतका मोठा अपहार झाल्यानंतरही अद्याप खरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल केला नव्हता.

राजलक्ष्मी बँक दोषी; तरीही कारवाई नाही

नाशिकमधील राजलक्ष्मी बँकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश खरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी संचालकपदाचा अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असतानाही त्यांनी अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली होती. विशेष म्हणजे याप्रकरणी खरे यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत ते दोषी आढळून आले असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, हे विशेष.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारीपदही वादात

खरे यांनी निवडणूक कामकाजात वारंवार कसूर केल्याप्रकरणी तसेच पद व अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, विशिष्ट व्यक्तींना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (पुणे) यांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांना संबंधितांबद्दल स्वयंस्पष्ट व वस्तुनिष्ठ अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे पत्राव्दारे सूचित केले होते. अहवालात खरे यांना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी या पदाचे कामकाज करण्यापासून दूर ठेवणे उचित होईल असे स्पष्ट मत मांडण्यात आले होते.

मार्केट कमिटी कर्मचार्‍यांकडून ९३ लाखांची लाच?

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी सतीश खरे यांच्यासह अन्य दोन अधिकार्‍यांनी ९३ लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पैसे घेऊनही कर्मचार्‍यांना आयोग लागू झाला नाही. खरेंनी पैसे घेतल्याची कबूली न दिल्यास त्यांची नार्कोे टेस्ट करा, असेही कर्मचार्‍यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

जिल्हा बँक: बेअरर चेकने घेतले पैसे?

नाशिक जिल्हा बँकेतून सतीश खरे यांनी गटसचिवांना सानुग्रह अनुदान दिले. त्याबदल्यात त्यांच्याकडून बेअरर चेकने पैसे परत घेतल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

नामकोची निवडणूक सदोष पद्धतीने राबवली

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत अधिकार नसताना निवडणूक सदोष पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप खरे यांच्यावर करण्यात आला होता. निवडणूक प्राधिकरणाने फेरमतदानाचे आदेश देणे, याबाबत सभासदांकडून वाढीव खर्च घेतल्याने सभासदांकडून तीन वेळा उपोषण करण्यात आले होते.

दारुच्या पार्ट्या घेतल्याची ऑडिओ क्लिप

ओझर येथील सिद्धीविनायक पतसंस्थेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी सतीश खरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अपहारकर्त्याने वेळोवेळी दारुच्या पार्ट्या दिल्याचा उल्लेखदेखील एका संचालकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.

सहकार मंत्र्यांनीही दिली होती तंबी

आठ दिवसांपूर्वीच सहकार मंत्र्यांकडे खरेंविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यांनीही खरे यांना कडक तंबी दिली. परंतु, तरीही खरेंच्या वागणुकीवर कुठलाही फरक पडला नाही.

आमदार व्हायचे होते..

सतीश खरे यांना देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे मनसुबे होते. त्यासाठीच ते मोठ्या प्रमाणात पैसे जमा करत असावेत. निवडणुकीबाबत त्यांनी निकटवर्तीयांशीही चर्चा केली होती.