माझ्या ९० वर्षांच्या आईकडून उद्धव ठाकरेंना निरोप..,किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्या यांची आयएनएस विक्रांत कथित घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. सोमय्यांची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून केली जात आहे. मात्र, ही चौकशी सुरू असतानाच किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचा मुलगा नील सोमय्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता मेधा सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही माझ्या आईला विसरलेले दिसत आहात. ९० वर्ष वय असलेल्या माझ्या आईने सांगितले आहे की, उद्धव ठाकरेंना निरोप द्या की माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल करा, अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही माझ्या आईला विसरलेले दिसताय

नील सोमय्याही चौकशीला हजर होणार आहेत. खोट्या एफआयआर असल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने नीललाही संरक्षण दिले आहे. तुमचे नेते संजय राऊत म्हणतात की, आता मेधा सोमय्या यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरलेले दिसताय. ९० वर्षांच्या माझ्या आईने सांगितलंय की उद्धव ठाकरेंना निरोप द्या की माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल करा. सगळे सोमय्या चौकशीला सामोरे जायला तयार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.

१३ तास काय, १३ दिवस चौकशी करा

उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला आव्हान देतो. तुम्ही माझी १३ तास काय, १३ दिवस चौकशी करा. उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्याचे तेरावे किरीट सोमय्या करूनच थांबणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

सोमय्या परिवार महाराष्ट्राच्या सेवेत हजर

उद्धव ठाकरे, त्यांचा परिवार आणि सरकार फक्त घोटाळे करून लोकांचे पैसे आणि रक्त शोषतायत. त्यांना वाटतंय देशात कुणी देशभक्त नागरीक नाहीये? सोमय्या परिवार महाराष्ट्राच्या सेवेत हजर आहे. एवढा उद्धटपणा महाराष्ट्राची जनता पहिल्यांदा पाहात आहे, असं सोमय्या म्हणाले.

राऊतांना आव्हान

संजय राऊत, तुमच्यात हिंमत होती, तर ५७ कोटींची एफआयआर का नाही केली? ७५०० कोटी अमित शाह यांना दिले, याची एफआयआर का नाही केली? नील सोमय्याच्या बोगस कंपनीवर का एफआयआर केली नाही?, असा सवाल सोमय्यांनी राऊतांना विचारला आहे.


हेही वाचा : मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार, रवी राणांचा इशारा