घरमहाराष्ट्रकोथडीगडावर पाण्याचे दुर्भिक्ष्य

कोथडीगडावर पाण्याचे दुर्भिक्ष्य

Subscribe

पर्यटन धोक्यात, स्थानिकांवर स्थलांतरांची पाळी

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ला असलेल्या कोथळीगडावरील पाणी आटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गड दर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. मात्र त्या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी राहणार्‍या स्थानिक नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. दरम्यान, पेठ येथे पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने एक विहीर मंजूर केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या हद्दीला अगदी लागून असलेल्या आंबिवली गावाच्या मागे कोथळीगड उभा आहे. किल्ल्यावरून एकाचवेळी रायगड आणि पुणे जिल्ह्यावर लक्ष ठेवता येत असल्याने स्वराज्यात या किल्ल्याला महत्त्व होते. एका पहाडावर पेठ हे गाव वसले असून, त्या गावाच्या पठारावर आणखी एका पहाडावर पेठ किल्ला म्हणजे कोथळीगड आजही दिमाखात उभा आहे. या कोथळीगवर गड, किल्लेप्रेमी मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. स्थानिक ग्रामस्थ त्यांना राहण्याची आणि न्याहारीची व्यवस्था त्यांच्या मागणीनुसार करीत असतात. त्याचवेळी किल्ल्यावर पाण्याचे तीन कुंड आहेत. पण त्या पाण्याच्या कुंडांमधील पाणी वापराविना दूषित असते. त्यामुळे पर्यटक ग्रामस्थ व्यवस्था करीत असलेल्या पाण्याचा वापर करतात.

- Advertisement -

आज पेठ येथे असलेली पाणीपुरवठा करणारी विहीर आटली आहे. त्या विहिरीत पाण्याचा थेंब राहिला नसल्याने पेठ ग्रामस्थांवर पाण्याचे संकट घोंघावत आहे. हा प्रश्न केवळ पेठ ग्रामस्थांचा नाही तर तेथे पर्यटनासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी येणार्‍यांसाठी कठीण बनला आहे. कारण गावात पाणी नाही असे समजल्यानंतर पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येणार नाहीत आणि ज्यावर गावातील अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. त्यांचे आर्थिक स्तोस्त्र बंद होणार आहेत. त्याचवेळी दुर्गम उंचावर असलेल्या पेठ गावात टँकरचे पाणी कसे पोहचविणार, हा प्रश्न देखील आहे. रहिवाशांना आता आपले रोजगार सोडून गावातून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

गावाला लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ग्रामस्थ किल्ला पाहण्यासाठी येणार्‍यांची सेवा करीत असतात. पाणी नसल्याने रहिवासी गाव सोडून खाली रहायला जाऊ लागले आहेत. – अशोक सावंत, ग्रामस्थ.

- Advertisement -

पेठ गावातील एकमेव विहीर लक्षात घेऊन त्या ठिकाणी आणखी एक विहीर मंजूर करून घेतली आहे. विहिरीचे काम सुरू आहे. – रेखा दिसले, जिल्हा परिषद सदस्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -