घरCORONA UPDATEकोथिंबीर उत्पादनातून शेतकरी लखपती

कोथिंबीर उत्पादनातून शेतकरी लखपती

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात शेतकरी त्रस्त झालेला असताना बारामती तालुक्यातल्या ३ गावांनी कोथिंबिरीला चांगला भाव मिळाल्याने जबरदस्त कमाई केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले असून त्याचा सर्वसामान्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतीवरही त्याचा काही प्रमाणात फरक जाणवत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी कमाई केली आहे. ही बाब आश्चर्यचकित करणारी असली तरी ती खरी आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी त्रस्त झालेला असताना बारामती तालुक्यातल्या ३ गावांनी कोथिंबिरीला चांगला भाव मिळाल्याने जबरदस्त कमाई केली आहे. इथल्या वानेवाडी गावातील अविनाश जगताप यांच्या शेतातील कोथिंबिरीला एकरी ४ लाख ५१ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. बारामती तालुक्यातील मुरूम आणि वाणेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर विक्रीतून एकूण ५० ते ५५ लाख रुपये कमावले आहेत.

बाजारात कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांना

कोरोना व्हायरसचे संकट आणि त्यामुळे घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या उभ्या पिकात जनावरे सोडली होती. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही न निघाल्याने ते त्रस्त झाले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. यात कोथिंबिरीला चांगला दर मिळायला लागला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांना विकली जात आहे. यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत आहेत.

- Advertisement -

२७ एकरात ५० ते ५५ लाख रुपये कमविले

वाणेवाडी, मुरूम आणि मळशी या तीन गावातील शेतकऱ्यांनी २७ एकर कोथिंबिरीतून तब्बल ५०-५५ लाख रुपये कमविले आहेत. गेल्या पाच वर्षातील कोथिंबिरीचा हा उच्चांकी दर असल्याचे कोथिंबिरीचे व्यापारी काका शिवरकर, महेश जगताप आणि अभिजित जगताप सांगतात. मुरूम आणि वानेवाडी या गावात गेल्या महिन्याभरात २७ एकरातून जवळपास ५० ते ५५ लाखांची उलाढाल झाली आहे. वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी याठिकाणी अवघ्या ७ एकरातून तब्बल १५ लाखाची उलाढाल केली आहे. वाणेवाडीतील शेतकरी अविनाश जगताप यांच्या एक एकरातील कोथिंबिरीला तब्बल ४ लाख ५० हजारांचा दर मिळाला आहे. वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप यांच्या एक एकर कोथिंबिरीला तब्बल ३ लाख २१ हजारांचा दर मिळाला आहे. हा दर गेल्या पाच वर्षातील सर्वोच्च दर ठरला आहे. कोथिंबिरीचे हे पीक अवघ्या एक महिन्याचे असते. एक एकर कोथिंबिरीला ४० हजारांच्या आसपास खर्च येतो. हा खर्च निघून वरून नफा झाल्याने कोथिंबिरीचे उत्पादन घेणारे शेतकरी खूश झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -