घरमहाराष्ट्रगीते आणि तटकरेंची कसोटी !

गीते आणि तटकरेंची कसोटी !

Subscribe

मित्रपक्षांची भूमिका निर्णायक

रायगड मतदारसंघातील गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळची निवडणूक सुनील तटकरे आणि अनंत गीते या उमेदवारांसाठी कठीण परीक्षा ठरणार आहे. या मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे सुनील तटकरे असे दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघेही उमेदवार तुल्यबळ असले तरी त्यांच्या विजयात मित्र पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सर्वसाधारणपणे सुरुवात होते. मात्र यावेळी दोन्ही मुख्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही अजून प्रचाराने जोर धरलेला नाही. हवेतील उष्णतेचा पारा वाढत असल्यामुळे कार्यकर्त्यांची दमछाक होत असल्यामुळे अजून म्हणावे तसे कार्यकर्ते कामाला लागलेले नाहीत. परिणामी प्रचाराचा पारा थंडच आहे.

- Advertisement -

तटकरे हे रायगड जिल्ह्यातीलच असून, त्यांना जिल्ह्याचा उत्तम अभ्यास आहे, तर गीते हे रत्नागिरी जिल्ह्यातील असले तरी दोनवेळा ते याच लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी तटकरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे तटकरे यांचे पारडे जड वाटत होते. परंतु काँग्रेसचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांनी शिवधनुष्य हातात घेतले. अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बॅ. अंतुले यांना मानणारा वर्ग गीते यांच्या पारड्यात मते टाकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीत तटकरे यांचा 2200 मतांनी पराभव झाला होता. परंतु त्यावेळी काँग्रेस त्यांच्या बाजूने होती, तसेच घराण्यांतील वादही तेवढा चिघळलेला नव्हता. मात्र आता अंतुले यांना मानणारा वर्ग, घराण्यातील वाद, घराणेशाही, दिलेला शब्द न पाळण्याची राजकीय परंपरा, अनेक चांगल्या कार्यकर्त्यांनी पाच वषार्र्ंत पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, मोदी लाट या सर्वांचा परिणाम मतपेटीवर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर गीते यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. परंतु त्यांनी रायगड जिल्ह्यात कोणतेही नजरेत येईल असे काम केलेले नाही. तसेच अवजड उद्योग मंत्रीपद स्वत:जवळ असूनही जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वाढ केली नाही. शिवाय उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकर्‍या देण्याचेही प्रयत्न केले नाहीत,असे सर्वसामान्य मतदारांचे म्हणणे आहे. दोन्ही उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मित्रपक्ष आपले वजन कसे वापरतात, त्यानुसार या दोघांचा विजय निश्चित होणार आहे. तटकरे यांना शेकाप व काँग्रेस, गीते यांना भाजपाने प्रामाणिक सहकार्य केले तर ही निवडणूक अटीतटीची होईल.

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मित्रपक्ष दगा देणार नाहीत, असे म्हटले जाते. तरी स्थानिक राजकारण पाहता कोणी वरचढ होणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -