घरमहाराष्ट्रशिवसेनेबरोबरच काँग्रेसच्या भुसभुशीत जमिनीवर उभा आहे महाविकास आघाडीचा डोलारा!

शिवसेनेबरोबरच काँग्रेसच्या भुसभुशीत जमिनीवर उभा आहे महाविकास आघाडीचा डोलारा!

Subscribe

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी प्रत्येक पक्षाने आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली होती. शिवसेनेतील बंडामुळे अपमानास्पदरीत्या सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक वस्तुत: प्रतिष्ठेची होती. मात्र, नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घटनेमुळे महाविकास आघाडीचा डोलारा हा सध्याच्या काँग्रेसच्या भुसभुशीत जमिनीवर उभा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

विधानसभेची निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढविली होती. भाजपाने 105 जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 56, 53 आणि 44 आमदार आहेत. असे असतानाही महाराष्ट्राची सत्ता काबिज करणे ही तर दोन्ही काँग्रेससाठी लॉटरीच होती. पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी ‘उठाव’ केल्याने महाविकास आघाडी पायउतार झाले. शिंदे गटाच्या बंडाला भाजपानेच हवा दिल्याचे नंतर स्पष्ट झाले.

- Advertisement -

या आघाडीतील शिवसेनेबरोबरच काँग्रेसची जमीन देखील भुसभुशीत असल्याचे भाजपाने आधीच ताडले होते. म्हणूनच शिवसेनेतील बंड समोर येण्यापूर्वी 20 जून 2022मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले. पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपाने ही किमया साधली. याचा फटका बसला तो काँग्रेसलाच! सुरक्षित उमेदवार मानले जाणारे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे या निवडणुकीत पराभूत झाले.

आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 30 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाने काँग्रेसलाच धक्का दिला आहे. नागपूर, अमरावती, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवत आहे. यापैकी नागपूरची जागा शिवसेनेकडे, अमरावती व नाशिक काँग्रेसकडे, औरंगाबाद राष्ट्रवादी आणि कोकण शेकापकडे आहे. मात्र नाशिकसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असतानाही त्यांचा मुलगा सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून भाजपाने येथे उमेदवार दिलेला नाही. याचाच अर्थ त्यांचा सत्यजित तांबेंना पाठिंबा असेल.

- Advertisement -

विशेष म्हणजे, एवढी मोठी घडामोड घडत असतानाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष याबाबत अनभिज्ञ होते. याची माहिती घेत असल्याची त्यांची प्राथमिक प्रतिक्रिया होती. त्यानंतर सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर, याबाबत आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना कल्पना दिली होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यावरून काँग्रेसची ही हाराकिरी आहे का, असाच प्रश्न निर्माण होतो. त्यातच पक्षफुटीने त्रस्त झालेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अमरावतीवरही दावा केला आहे. अमरावतीची जागा शिवसेनेला मिळाली असती तर आम्ही आणखी जोरात लढलो असतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा काँग्रेसवरील अविश्वास आहे का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -