घरताज्या घडामोडीMahad building collapse: महाड इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, ६ जण बेपत्ता,...

Mahad building collapse: महाड इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, ६ जण बेपत्ता, ७८ जण बचावले

Subscribe

संपूर्ण कोकणाला हादरवून सोडणार्‍या महाड येथील काजळपुरा भागातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह हाती लागले असून, १६ जण अद्याप बेपत्ता आहेत. काळजाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेत ७८ जण आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. मुस्लीम बांधवांची वस्ती असलेल्या या इमारतीत ४१ सदनिका होत्या, तर ९७ हून अधिक जण तेथे वास्तव्यास होते. या दुर्घटनेमुळे महाड शहर सुन्न झाले असून, बचावलेल्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. ही इमारत ५ मजली असल्याने मातीचे ढिगारे उपसण्यास वेळ लागत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही इमारत काही क्षणात जमीनदोस्त होऊन एकच हाहा:कार उडाला. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काहीजण बाहेर पडल्याने ते बचावले. या ठिकाणी राहत असलेले बशीर चिचकर यातून सुखरूप बाहेर पडले. इमारत भूकंप आल्यानंतर ज्याप्रमाणे हलते तशी हलू लागली आणि आम्ही बाहेर पडू लागलो, असे चिचकर यांनी सांगितले. बाहेर पडताना चिचकर यांचा पुतण्या आवेश आणि इतर तरुणांनी सुरुवातीला २० जणांना बाहेर काढले आणि इमारत कोसळली. काही क्षणातच स्थानिक तरुणांसह पोलीस आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये महाबळेश्वर (जि. सातारा) येथून आलेल्या एका पथकाने शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर एनडीआरएफचे जवान देखील दाखल झाले. महामार्गाचे काम करत असलेली एल अँड टी कंपनीची यंत्रणा देखील त्वरित दाखल झाली. यामुळे भराव काढण्यास वेग आला.

- Advertisement -

या दुर्घटनेतून आतापर्यंत ७८ जण बचावले असून, अद्याप ६ जण बेपत्ता आहेत. मदत कार्याला वेग आला असून इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, महाड ट्रामा केअरचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आदी वैद्यकीय अधिकारी आणि शहरातील विविध रुग्णालयांचे डॉक्टर दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत.

२०११ मध्ये पनवेलच्या कोहिनूर डेव्हलपरने बांधलेल्या या इमारतीच्या दर्जावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला जात होता. मात्र तत्कालीन नगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संबंधित दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात नगर पालिकेचे अभियंता सुहास कांबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर बिल्डर फारूक काझीसह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली झमाने, वास्तू विशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड, कनिष्ठ अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर भादंवि कलम ३०४, ३०४ अ, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, तसेच पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली, तसेच जखमींची विचारपूस केली. पालकमंत्री तटकरे यांनीही दोषींवर कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

ठळक नोंदी :

  • राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाड दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त.
  • इमारत कोसळत असताना स्वप्निल शिर्के आणि नवीद हमिद दुस्ते हे दोन तरुण जखमी झाले. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • जिल्हा प्रशासनाची बचाव कार्यासाठी धाव.
  • पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके दाखल. विशेष म्हणजे या पथकांसाठी मार्गावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.
  • माणगाव, तळे, पोलादपूर, पनवेल, रोहे, आलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून रुग्णवाहिकांना पाचारण. तसेच ठिकठिकाणाहून जेसीबी, डंपर, पोकलेन आदी यंत्रणा आणण्यात आली.
  • महाड, माणगाव, पेण, पनवेल येथील खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालये जखमींवर उपचारासाठी सज्ज करण्यात आली.
  • रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर अवघ्या चार तासात शंभर तरुणांचे रक्तदान.
  • एनडीआरएफकडून जिवंत आणि मृत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचा वापर.
  • अनेक सामाजिक संस्थांनी मदत कार्यात पुढाकार घेतला. काही कंपन्यांनीही मदतीचा हात देऊ केला.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात.

देव तारी त्याला…

४ वर्षाचा महम्मद इमारतीच्या ढिगार्‍याखाली १७ तासानंतरही जिवंत होता. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती सर्वांनाचा आली. बांगी कुटुंबातील नौसीन नदिम बांगी (आई), आयेशा नदिम बांगी (७), महम्मद नदिम बांगी (४), रुकया नदिम बांगी (२) हे इमारतीच्या ढिगार्‍याखाली सापडले. यापैकी ढिगारा उपसत असताना महम्मद जिवंत सापडला. जवळपास १७ तासांनी तो जिवंत सापडल्याने नातेवाईक आणि बचाव कार्यातील लोकांनी टाळ्या वाजवत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने या मुलांची आई नौसीन बांगी मात्र या अपघातात वाचली नाही.


हेही वाचा – मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५४१ कोटी जमा, खर्च केले फक्त १३२ कोटी


धोक्याकडे झाले दुर्लक्ष

या इमारतीचे पिलर कमकुवत झाले होते. पिलरवरील सिमेंट आवरण निघून गेले होते. सकाळीच काही जणांच्या ही बाब निदर्शनास आली होती. मात्र काही दिवसांपासून पिलरची अवस्था अशीच असल्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि सायंकाळी ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पिलरच्या दुरवस्थेचा फोटो सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

काही कामानिमित्त मी घराबाहेर पडलो होतो, तोच इमारत कोसळल्याचा फोन आला. इमारतीजवळ जाऊन पाहतो तर इमारत दिसली नाही. मी प्रचंड घाबरलो, मात्र समोर मुले आणि पत्नी रडताना दिसताच मी स्वतःला सावरले. आमचा संसार आणि लाखमोलाची माणसे या निकृष्ट दर्जाच्या कामाचे बळी ठरले आहेत.
– शाहनवाज लोरे, इमारत रहिवासी

इमारत कोसळत असल्याचा आरडाओरडा सुरु झाला आणि आम्ही बाहेर पडण्यास सुरूवात केली. मी जेमतेम बाहेर पडले आणि पाच मिनिटातच इमारत भुईसपाट झाली.
– अन्वरी वाहिद अधिकारी, इमारत रहिवासी

मृतांची नावे

नवीद जावेद झमाने (३२), नौसीन नदिम बांगी (२९), आदिल हाशीम शेखनाग (१४), मतीन हिदायत मुकादम, शौकत अलसुरकर (५०), फातिमा शौकत अलसुरकर, रोशन दाऊदखान देशमुख (७५), इस्मत हाशीम शेखनाग (३८), अल्तमश महमूद बल्लारी, फातिमा अन्सारी.

जखमींची नावे

नामिरा शौकत मसुरकर (१९), फरिदा रियाज पोरे, नवीद हमीद दुस्ते (३२), महमद बांगी (4), स्वप्निल प्रमोद शिर्के (२४), जयप्रकाश कुमार, संतोष सहानी, दीपक कुमार. जखमींवर शहरातील ग्रामीण आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका होत्या. तर एक जिम, एक कार्यालय आणि एक मोकळा हॉल होता. ए विंगमध्ये २१ सदनिकांमध्ये ५४ रहिवासी राहत होते. यातील ४१ जण सुखरूप बाहेर पडले, तर १३ जण ढिगार्‍याखाली अडकले. बी विंगमध्ये २० सदनिका होत्या यातील ४३ व्यक्तींपैकी ३७ सुखरूप बाहेर पडले, तर ६ जण अडकले. एकूण ९७ पैकी ७८ जण सुखरूप बाहेर पडले.


हेही वाचा – हिवाळ्यात काय येणार? कोरोनाची लस की दुसरी लाट? जाणून घ्या तज्ज्ञांची मते


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -