घरताज्या घडामोडीराज्याला पुरेसे remdesivir इंजेक्शन ४ दिवसात मिळणार - राजेश टोपे

राज्याला पुरेसे remdesivir इंजेक्शन ४ दिवसात मिळणार – राजेश टोपे

Subscribe

येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भरून निघेल असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण हा तुटवडा भरून काढण्यासाठी केलेल्या व्यवस्थेनुसार येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा भरून निघेल. रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी साधारणपणे १२ ते १५ दिवस लागतात. त्यापैकी ८ ते १० दिवस पुर्ण झाले आहेत. त्यामुळेच येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यात कोरोना रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा भरून निघेल असे त्यांनी सांगितले. टास्क फोर्सने सुचवल्या प्रमाणेच या इंजेक्शनचा पुरवठा राज्यात होईल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टोपे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते.

राज्याच्या टास्क फोर्सने रेमडेसिवीर इंजेक्शन कसे पुरवण्यात यावे याबाबतची स्पष्टता दिली आहे. प्रत्येक जिल्हा निहाय असणाऱ्या अॅक्टीव्ह रूग्णसंख्येच्या प्रमाणातच या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणे गरजेचे असल्याचे टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे टास्क फोर्सने सुचवल्या प्रमाणेच इंजेक्शनचा वापर होणे गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले. रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हींग म्हणजे जीव वाचवणारे औषध नाही असेही ते म्हणाले. पण खाजगी हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या इंजेक्शनच्या वापरासाठी भरारी पथकांचीही स्थापना केली आहे. त्यामुळेच या भरारी पथकांमार्फत इंजेक्शनच्या वापरावर तपासणी करण्याचा अधिकार या पथकांना देण्यात आला आहे. खाजगी हॉस्पिटलमार्फत या इंजेक्शनचा वापर योग्य होतो की नाही, याबाबतची पडताळणी भरारी पथकांकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्हानिहाय प्लॅन्ट

राज्यात सध्या १४०० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज आहे. राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी काही कंपन्यांसोबतही संपर्क साधला आहे. त्यामध्ये स्टील उत्पादनात असणाऱ्या जेएसडब्ल्यू या कंपनीकडून २०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालून राज्याच्या ऑक्सिजन उपलब्धतेत वाढ होईल अशी खातरजमा केली आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात जेएसडब्ल्यूकडून ऑक्सिजन उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. पण राज्यातील परिस्थिती पाहता ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट हे उभारावेच लागतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या एकुण रूग्णांपैकी १० टक्के इतका रूग्णांचा टक्क्याला ऑक्सिजनची गरज लागते. त्यामुळेच ऑक्सिजनचा वापर असणाऱ्या रूग्णांसाठी बायपॅपचा वापर करावा असे टास्क फोर्समार्फत सांगण्यात आले आहे. बायपॅपमुळे रूग्णांना कमी ऑक्सिजनची गरज लागेल. तसेच हॉस्पिटलमधील ऑक्सिजनची गळती रोखण्यासाठीची पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रत्येक जिल्हानिहाय ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून २५ बेड्स ते १०० बेड्स अशा विविध प्रकारच्या मॉडेलसाठी ऑक्सिजन निर्मात्या कंपन्या राज्य सरकारला मदत करायला तयार आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -