घरमहाराष्ट्रराज्यात पावसाच्या नाही, घामाच्या धारा! मागील वीस दिवसांपासून पावसाची दडी

राज्यात पावसाच्या नाही, घामाच्या धारा! मागील वीस दिवसांपासून पावसाची दडी

Subscribe

उन्हाच्या चटक्यांमुळे जीव मेटाकुटीला, पिण्याच्या पाण्याच्या संकटाची भीती, आणखी एक आठवडा पावसाची पाठ

मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा मोठा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असून पहिली पेरणी वाया गेल्याने दुबार पेरण्यांच्या संकटाने बळीराजाचा जीव मेटाकुटीला आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसाने मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली असून अधून मधून पाऊस पडत असला तरी राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झालेला नाही. सोमवारपासून तुरळक सरींची अपेक्षा असली तरी जुलै हा एकच महिना धो धो पावसाचा असल्याने तो तसा झाला नाही तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट राज्यासमोर उभे राहू शकते.

मान्सून येऊनही मागील दोन आठवडे राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्यातील शेतकर्‍यांना आणखी एक आठवडा वाट पहावी लागणार आहे. शनिवारी दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात घाट परिसरात आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

- Advertisement -

मागील १०-१२ दिवसांत मुंबईत खूपच कमी पाऊस पडला आहे. कुलाबा सांताक्रूझ वेधशाळेने जारी केलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरात मागील १० दिवसांचा पावसाचा आलेख एकरेषीय राहिला आहे. पहिल्या एक-दोन पावसामुळे हा आलेख किमान सरासरी पावसापेक्षा वरच्या दिशेला आहे. शनिवारी मुंबई आणि ठाणे परिसरात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी जवळपास पावसाची शक्यता नाही. यामुळे मुंबईसह परिसरात भर पावसात उन्हाचे चटके बसत असून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

दक्षिण कोकण आणि घाट परिसरात शनिवारपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असेल. ५, ६ आणि ७ जुलैला मात्र दक्षिण महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -