धुमधडाक्यात सुरू झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; जाणून घ्या कारण…

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. या समृद्धी महामार्गावरून अतिशय धुमधडाक्यात नागपूर- शिर्डी एसटी बस सुरू केली होती.

Samruddhi-Mahamarg-Nagpur-Shirdi-Highway

Samruddhi Mahamarg : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. या समृद्धी महामार्गावरून अतिशय धुमधडाक्यात नागपूर- शिर्डी एसटी बस सुरू केली होती. परंतू काही महिन्यातच ही बस सेवा बंद करण्याची वेळ आलीय. अपेक्षेप्रमाणे डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

बहुचर्चित असलेल्या समृद्धी महामार्गावरील पहिली लालपरी नागपूर- शिर्डी मार्गावर धावली. या एसटी बस सेवेचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला होता. या बसमुळे प्रवाश्यांना केवळ तेराशे रूपयात आठ तासात शिर्डीला पोहोचता येत होते. त्यामुळे या मार्गावरील एसटीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतू प्रतिसाद तर लांब राहिलं, साधं या एसटीसाठी डिझेलचे तरी पैसे निघतील एवढे सुद्धा प्रवासी मिळत नसल्यामुळे अखेर ही एसटी केवळ तीन महिन्यातच बंद करण्यात आली.

या बस सेवेला डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त ४१ टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात ही संख्या आणखी कमी होऊ लागली आणि फक्त १३ टक्केच प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात तर आणखी कमी प्रवासी होऊन संख्या आठ टक्क्यांवर पोहोचली. अनेक दिवस तर एकही प्रवासी नव्हता, अखेर ही बससेवाच बंद करण्याचा निर्णय एसटी अधिकाऱ्यांनी घेतला.

आता पुढे शालेय परीक्षांचा काळ पाहता प्रवासी संख्या आणखी कमी होईल हे लक्षात घेऊन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची परवानगी मागत सध्या बस सेवा स्थगित ठेवली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग एसटीला मात्र आर्थिकदृष्ट्या पावलेला नाही असंच सध्याचं चित्र आहे.