घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ...ते तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील; स्टार प्रचारकांच्या यादीवरील...

Lok Sabha 2024 : …ते तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील; स्टार प्रचारकांच्या यादीवरील टीकेवरून सेनेचा पलटवार

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 40 नेत्यांची नावे आहेत. या यादीवरूनच शिवसेना उद्धव गटाचे नेता आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच आम्ही युती धर्म पाळतो असं सांगत जबरदस्त टोलाही हाणला आहे.

मनीषा कायंदे काय म्हणतात?

आम्ही प्रसिद्ध केलेली यादी ही फक्त शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नसून महायुतीच्या स्टार प्रचारकांची आहे. युती धर्म पाळणे ही आम्हा सर्व मित्रपक्षांची जबाबदारी आहे. कदाचित लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्ही निराश झाला असाल हे समजू शकतो.
बाकी युती धर्म कसा पाळू नये हे तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील, अशा शब्दात कायंदे यांनी अंबादास दानवे यांच्या दुखऱ्या नसीवर बोट ठेवले.

- Advertisement -

शिवसेना उद्धव गटाने बुधवार, २७ मार्च रोजी लोकसभेच्या १७ जागांचे उमेदवार जाहीर केले. यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक, या जागेसाठी अंबादास दानवे देखील इच्छुक होते. मात्र, या स्पर्धेत खैरे यांनी बाजी मारत उमेदवारी पटकावली. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. याचाच संदर्भ घेत, कायंदे यांनी दानवे याना टोला लगावला आहे.

- Advertisement -

त्यापूर्वी सकाळी शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवरून अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका केली होती. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहामध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत, अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ४० नावं जाहीर केली आहेत. या यादीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले यांचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -