घरमहाराष्ट्रसंभाजीराजेंचे उपोषण अखेर मागे

संभाजीराजेंचे उपोषण अखेर मागे

Subscribe

मंत्री एकनाथ शिंदे आणि दिलीप वळसे-पाटील यांची यशस्वी मध्यस्थी, राज्य सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी संभाजीराजेंची उपोषणस्थळी जावून भेट घेत सरकारने त्यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले. या यशस्वी मध्यस्थीनंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून सेवेत घेण्यात येईल. त्यासाठी महिन्याभरात मंत्रिमंडळासमोर तसा प्रस्ताव मांडण्यात येईल. यासह इतरही मागण्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी राज्य सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे,दिलीप वळसे पाटील आणि अमित देशमुख यांनी दिले.

- Advertisement -

सरकारने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतली होती. त्यातच संभाजीराजेंची तब्येत बिघडल्याने मराठा ठोक मोर्चाही आक्रमक झाला होता. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा इशारा मराठा ठोक मोर्चाने दिला होता. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठीही बोलावण्यात आले होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली. त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर लहान मुलाच्या हातून रस घेत संभाजीराजेंनी आंदोलन मागे घेतले. संभाजीराजेंसोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आपले उपोषण सोडले.

- Advertisement -

माझ्या चेहर्‍यावर देखील आता हास्य आले. मलाही पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. मला कायम पाठिंबा देणार्‍या सर्व मराठा संघटनांचे मी आभार मानतो. हे सर्व मला २००७ पासून पाठिंबा देत आहेत. या सर्व संघटनांनी दाखवून दिले की हा खर्‍या अर्थाने शाहूंचा वंशज आहे. राजे तुम्ही फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित राहायचे नाही, तर महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी महाराजांचे नाव नेण्याची तुमची जबाबदारी आहे.
-संभाजीराजे छत्रपती, खासदार

जास्त मागण्या मान्य : एकनाथ शिंदे
संभाजीराजेंनी सातच मागण्या केल्या होत्या.मात्र राज्य सरकारने जास्तीत जास्त मागण्या मान्य केल्या आहेत.तसेच त्यांना लेखी मंजुरीही दिली. कालबद्ध मर्यादेत या मागण्या अंमलात आणण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘या’ मागण्या मान्य
शासकीय सेवेत निवड झालेल्या मराठा तरुणांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात
सारथीला आगामी अर्थसंकल्पातून किती निधी देणार हे स्पष्ट करावे
सारथी संस्थेचे महसुली विभागवार कार्यालये व कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करावे
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अतिरिक्त निधी देण्यासोबतच पदभरती करावी
मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी पूर्ण करावी
कोपर्डी खटल्यातील पीडितेला न्याय मिळवून द्यावा
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण करावे
मराठा आरक्षण प्रकरणी न्यायालयातील खटल्यासंबंंधात पुढील दिशा व कृती ठरविणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -