शिंदे गटाचे मनसेत विलीनीकरण?

गुवाहाटीत तळ ठोकून असलेल्या शिंदे गटाला पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नसल्यास एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या निमित्ताने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते.

mns chief raj thackeray tweet after eknath shinde take oath of maharashtra cm

गुवाहाटीत तळ ठोकून असलेल्या शिंदे गटाला पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नसल्यास एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या निमित्ताने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला मनसेशी जवळीक करणे शक्य असल्याचेही म्हटले जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील शिवतीर्थ येथे सोमवारी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, परंतु एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोनवरून दोनदा चर्चा केल्याचे वृत्त समोर आल्याने या सत्तासंघर्षाच्या नाट्यात मनसेचीही भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

मनसेनेही तातडीने शिवतीर्थावर बैठक घेतल्याने मनसेबाबतच्या वावड्यांना ऊत आला आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय निर्देश देतात, राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मैदानात उतरणार का, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वादात आम्हाला रस नाही. शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला याला अनेक कारणे आहेत, परंतु त्यातील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदुत्वाचा मुद्दा, जो मुद्दा आम्ही राज ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात आहोत. हे काही कॉमन मुद्दे आहेत. त्या अनुषंगाने जवळीक होऊसुद्धा शकते, परंतु सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचा आहे.
-राजू पाटील, आमदार, मनसे