घरमहाराष्ट्रमहाराष्‍ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

महाराष्‍ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

Subscribe
लखिमपूर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला राज्यात काही ठिकाणी कडकडीत तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यभर व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, दहानंतर मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात शिवसैनिक तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नांदेड, यवतमाळ, बीड येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे दुकानदारांनी आपआपली दुकाने बंद केली. अनेक ठिकाणी खासगी कार्यालयेही बंद करण्यात आली होती. बाईक रॅलींचे आयोजन करत कार्यकर्ते दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले.नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची पाठ फिरताच पुन्हा दुकाने सुरू झाली. मुंबईत बेस्टच्या ८ ते १० बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सकाळी बसेस रस्त्यावर काढल्याच नाहीत. अंधेरी, सायन, विक्रोळी, घाटकोपर येथे शिवसैनिकांनी रस्ता रोखून धरला होता. तर ठाण्यात शिवसैनिकांकडून रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आली. मुंबई लोकल वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बुलढाण्यात महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चंद्रपूरमध्ये शिवभोजन हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली. राज्यातील बहुतेक सर्वच एपीएमसी बाजारपेठा बंद होत्या. औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी चार वाजल्यानंतर मात्र दुकाने आणि रहदारी पूर्वीसारखीच सुरू झाली होती.

-राज्यभरात सकाळी १० वाजेपर्यंत व्यवहार सुरळीत
-नाशिकमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर येताच दुकाने बंद
-मुंबईत काही ठिकाणी रस्तारोको, ठाण्यातही आंदोलन
-मुंबईत १० बेस्ट बसेस् फोडल्या, रिक्षाचालकाकाडून लूट
-ठाण्यात शिवसैनिकांकडून रिक्षा चालकांना मारहाण
-बुलढाण्यात मविआ, भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
-जळगावमध्ये भाजपा आणि मविआचे कार्यकर्ते भिडले
-चंद्रपुरात शिवभोजन हॉटेलाची कार्यकर्त्यांकडून तोडफोड
-औरंगाबाद, रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्ग, अल्प प्रतिसाद
-भाजपकडून बंदविरोधात पत्रकार परिषदांचा सपाटा

मुंबईत बंद यशस्वी : काही ठिकाणी शिवसैनिकांची दमदाटी

उत्तर प्रदेशातील लखिमपूर येथे चार शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या कृत्याविरोधात तसेच केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध म्हणून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या सोमवारच्या महाराष्ट्र बंदला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईसह राज्यभरातील जनतेने उत्स्फूर्तपणे आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी झाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला.

- Advertisement -

मुंबईत आज बेस्टची वाहतूक दिवसभर बंद होती. त्यामुळे कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे प्रवास करताना मोठे हाल झाले. मात्र,संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. संध्याकाळी बेस्ट बसेस रस्त्यावर धावू लागल्याने चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईतील दुकानदार, व्यापार्‍यांना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दमबाजीमुळे दुकाने नाईलाजाने बंद ठेवावी लागली.

आजच्या बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ताकदीने उतरल्याचे दिसले. दादर येथील शिवसेना भवन परिसर, वरळी, लालबाग, चेंबूर आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. वरळीच्या आंदोलनात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सहभागी झाल्या होत्या. तर आंदोलन करताना माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांना वरळीत पोलिसांनी ताब्यात घेतले. साकीनाका जंक्शन येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढला. असल्फा मेट्रो स्थानक येथे रास्ता रोको करण्यात आला. घाटकोपर अंधेरी लिंक रोड रोखून धरण्यात आला होता. यामुळे दोन्ही मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -

विक्रोळीचे आमदार सुनील राऊत हे पूर्वद्रुतगती मार्गावर आपल्या कार्यकर्त्यांसह उतरले होते. टायर जाळून येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे ठाण्याकडे जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. चेंबूरच्या अमर महाल जंक्शन येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि शिवसेनेने आंदोलन केले.

येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बंदमध्ये नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा सहभाग दिसला. एरवी बाजार समितीत रोज ७०० च्या आसपास गाड्या येतात. आज मात्र, बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता. येथील व्यापारी आणि माथाडी कामगारांनी संपाला सक्रिय पाठिंबा दिला. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या व्यापार्‍यांच्या संघटनेने बंदला पाठिंबा दिला होता. दुपारी चार वाजेपर्यंत मुंबई, ठाणे परिसरातील ८० टक्के व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती, असे संघटनेचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितले.

काही व्यापारी भाजपला मानणारे, म्हणूनच बंदला विरोध ः भुजबळ

 काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. तर, काही भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणार्‍या व्यापार्‍यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच. मात्र, तरीही राज्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद लाभला, असा दावा सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापार्‍यांनी पाठ फिरवली. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत. त्यामुळे येवल्यात तरी व्यावसायिक आणि दुकानदारांनी या बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राने शेतकर्‍यांना चिरडून मारले. त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून या बंदचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणार्‍या व्यापार्‍यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र बंदला विरोध करण्याच्या तुरळक घटना घडल्या असतील. मात्र, त्याचा बंदवर काहीही परिणाम झाला नाही. हा बंद शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आहे. आपल्या राज्यातल्या शेतकर्‍यांनाही त्याचा फायदा होणार आहे. दर ठरवण्याची मक्तेदारी मोडून काढणे, शेतकर्‍यांसाठी आवश्यक आहे. कृषी कायदे हे शेतकर्‍यांसाठी घातक आहेत. शेतकर्‍यांच्या हमीभाव आंदोलनाला यश मिळेल. लखीमपूर हिंसाचारात भाजप मंत्रीपुत्र असल्याने या आंदोलनाला भाजपचा विरोध असणारच. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मात्र, या संपामुळे शेतकर्‍यांची एकजूट होईल, असा दावा त्यांनी केला.

आंदोलकांची पाठ फिरताच नाशकात व्यवहार पूर्ववत

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास या बंदला चांगला प्रतिसाद दिसून आला. मात्र, दुपारनंतर बाजारपेठांमधील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरातून फेरी काढत व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून फेरी काढत व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शालीमार, सीबीएस, भद्रकाली, मेनरोडमार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान केंद्र सरकारचा शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यापार्‍यांना हात जोडून विनंती करत शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सकाळी काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडली होती. मात्र, आंदोलकांनी आवाहन केल्यानंतर दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी पाठ फिरताच पुन्हा त्या भागातील व्यवहार पुर्ववत सुरू करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

उद्योग आघाडीचा विरोध
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केले. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापार्‍यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन करत पेशकार यांनी बंदला विरोध दर्शवला.

बाजार समित्यांमधील उलाढाल ठप्प
महाविकास आघाडीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील बंदमध्ये सहभागी झाले होेते. या बंदमध्ये आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीने सहभाग नोंदवला. सोबतच जिल्ह्यातील प्रमुख १५ बाजार समित्यांमधील उलाढालही ठप्प झाली होती. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीच्या बाहेर एक मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शेतकरी संघटनाही दूर
लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला होता. गेल्या ७० वर्षांपासून शेतकर्‍यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकर्‍यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकर ढिकले यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -