शिवसेना आणि भाजपच्या नैसर्गिक युतीबाबत उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी – खासदार हेमंत गोडसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे काही खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मांडलं आहे.

हेमंत गोडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होत आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं मत बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

२५ वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीचा अनुभव वेगळा आहे. त्यामुळे २५ वर्ष नैसर्गिक युती होती, मात्र अडीच वर्षात अनेक प्रकल्प रखडले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन संवाद साधून मार्ग निघतो का हे पाहावं, असे मत अनेक खासदारांनी मांडली, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले.

सिपेट प्रकल्पामध्ये दोन हजार मुलांना प्रशिक्षण, शिक्षण आणि रोजगार मिळणार होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खोडा घातला. गोवर्धन शिवारात भुजबळ इन्स्टिट्यूट बाजूला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे सांगून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला, असा आरोप गोडसेंनी छगन भुजबळ यांच्यावर केला.


हेही वाचा : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या 40 जागा रिक्त; आणखी पाचजण निवृत्तीच्या मार्गावर