मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणेच.., राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

mp sanjay raut

२०२४ च्या तयारीला राज्य सरकारकडून सुरूवात झाली आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. हे माझे मत पक्के आहे. न्याय व्यवस्थेवर दबाव येईल, असं वाटत नाही. मात्र, संविधान, घटना आणि कायद्याचं उल्लंघन करणारं सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार ठोंब्याप्रमाणेच बसून आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

या सरकारने वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. हे सरकार व्हेंटिलेटरवर असून सुप्रीम कोर्टाने काढलं तर हे राम होईल. १६ आमदार अपात्र ठरतील. कुणीही त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना समोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं, असं संजय राऊत म्हणाले.

अधिवेशनाच्या काळात अनेक प्रकरणं समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे… जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरणं समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला.

शिवसेना एकचं, हे गट तट चालू आहे ते तात्पुरतं आहे. शिवसेना एकचं आहे आणि एकचं राहील. शिवसेना हा एक महावृक्ष आहे आणि या महावृक्षाचे बीज बाळासाहेबांनी रोवलं आहे. महावृक्ष फोफावतो, वाढतो, पाचोळा होतो, कचरा होतो तो कचरा काही लोकं उचलून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत आहेत. नाशिक आणि इतर ठिकाणची कचरपट्टी उचलून नेत आहेत आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करत आहेत. कचरा हा आग लावण्यासाठी असतो आणि त्याचा धूर फार काळ राहत नाही, अशी टीका राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.


हेही वाचा : राज्य सरकार व्हेंटिलेटरवर, ते फेब्रुवारी महिना पाहणार नाहीत; संजय राऊतांचा