घरताज्या घडामोडीक्रिडा संकुलातील पार्किंगसाठी निधी देण्यास महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचा नकार

क्रिडा संकुलातील पार्किंगसाठी निधी देण्यास महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचा नकार

Subscribe

मुळ आराखड्यानुसार सुरू करण्याचे निर्देश

जिल्हा क्रिडा संकुलात स्मार्ट सिटी अंतर्गत भुयारी पार्किंगचा प्रस्ताव महापालिकेकडून देण्यात आला होता. मात्र याकरीता सुमारे शंभर कोटींची आवश्यकता असून हा निधी देण्यास महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि जिल्हा परिषद यांनी नकार दिल्याने मुळ आराखड्यानुसार क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर स्मार्ट सिटी अंतर्गत भुयारी पार्किंग उभारण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. सदर जागा ही जिल्हा परिषदेअंतर्गत असून जिल्हा परिषदेने ही जागा देण्यास नकार दिला तसा ठरावही जिल्हा परिषदेने केला. यावरून जिल्हा परिषद आणि महापालिकेत चांगलीच जुंपली होती. त्यानंतर हा चेंडू पालकमंत्र्यांच्या कार्टात गेला. या प्रस्तावासंदर्भात शनिवारी झालेल्या क्रीडा संकुलाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून 25 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. परंतु येथे भुयारी पार्किंग उभारण्यासाठी सुमारे शंभर कोटींची आवश्यकता आहे. शासनाकडून प्राप्त निधी व्यतिरिक्त निधी देण्यास स्मार्ट सिटी, जिल्हा परिषद अथवा महापालिकेने निधी देण्याबाबत नकार दर्शवला आहे. त्यामुळे मुळ आराखड्यानुसार क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपशिक्षण अधिकारी एस.एन.झोले, महानगरपालिका उपअभियंता एस.जे.काझी, आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता राऊत, शिवछत्रपती पुरस्कार्थी हितेंद्र महाजन, गोरख बलकवडे, राजेंद्र निबांळते, आदी उपस्थित होते.

२४ वेगवेगळया सुविधा
क्रीडा संकुला अंतर्गत प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, सिथेटीक धाव मार्ग, फुटबॉल मैदान, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, टेनिस, बास्केटबॉल, इत्यादी मैदाने, इनडोअर गेम हॉलमध्ये बॅटमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, ज्युदो, तलवारबाजी, बॉक्सिंग, कॅरम, बुध्दिबळ, योगा, व्यायमशाळा, या व्यतिरीक्त कॅफेटेरीया, पार्कींग अशा एकूण २४ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक यांनी यावेळी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -