घरमहाराष्ट्रनागपूरNana Patole : असंवैधानिक सरकारने केलेली अटक हुकूमशाही प्रवृतीची; कुणाल राऊत प्रकरणी काँग्रेस आक्रमक

Nana Patole : असंवैधानिक सरकारने केलेली अटक हुकूमशाही प्रवृतीची; कुणाल राऊत प्रकरणी काँग्रेस आक्रमक

Subscribe

काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर कुणाल राऊत यास नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकांचे वारे राज्यात वाहण्यास सुरुवात झाली आहे. याचे पडसाद विविध पातळीवर उमटत आहेत. यातच काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सला काळे लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक सरकारने केलेली ही अटक हुकूमशाही  प्रवृतीची आहे. याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध केल्या जात असल्याचेही ते महणाले. (Nana Patole Arrest by unconstitutional government with dictatorial tendencies Patole aggressive in Kunal Raut case)

काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर कुणाल राऊत यास नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सला काळे लावल्याने आणि त्याच पोस्टर्सवरील ‘मोदी’ हा शब्द खोडल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी कुणाल राऊत याने आपल्या साथीदारांसह पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले होते. त्यानंतर त्याने मोदी या शब्दावर भारत असेही स्टिकर लावले होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याने केला होता. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळेही फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई करत कुणाल राऊत याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. सध्या कुणाल राऊत आणि काँग्रेसच युवा कार्यकर्ते पोलीस कोठडीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Kalyan Firing : बंदुकीचं लायसन्स होणार रद्द? ठाणे गोळीबार घटनेनंतर परवान्यांबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

सरकारवरील रोष थांबविण्यासाठी ही अटक

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यास अटक केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिले की, केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ ऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे. हें संविधान विरोधी आहे. पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे, ही अक्षम्य चूक महाराष्ट्रभर युवक, शेतकरी, महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याविरोधात लेखी निवेदन दिले गेले. निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. मात्र, सरकार चूक दुरुस्त करायला तयार नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेसमोरील या जाहिरातीच्या बोर्डला काळे फासून आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा : Ulhasnagar Firing Case : गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिंदे गटाच्या मंत्र्यांची मागणी

यामुळे चिडलेल्या भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांचा गैरवापर करून आमच्या युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक केली आहे. कुणाल राऊत सातत्याने बेरोजगारी, महागाई, नोकर भरतीतील भ्रष्टाचार याविरोधात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहे. राज्यभरातील युवकांचा ‘शिंदे- फडणवीस- पवार’ सरकारवरचा रोष युवक काँग्रेस, काँग्रेसच्या आंदोलनातून व्यक्त होतं आहे. हें थांबवण्यासाठीची ही अटक आहे. असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रसंगी कुणाल राऊत आणि त्याच्या युवक काँग्रेसमधील सहकाऱ्यांसोबत आहे. अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक सरकारने केलेली ही अटक हुकूमशाही प्रवृतीची आहे. याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो अशा शब्दांत नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -