थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहिलं नसेल, असं सांगतानाच पटोले म्हणाले, “भाजपने जे खड्डे खोदलेत…”

सत्यजीत तांबे-नाना पटोले नंतर आता बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहीत तक्रार केल्यानंतर आता राज्यभरात नाना पटोलेंविरोधात बंड पुकारल्यामुळे आता नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आल्याचं चित्र दिसतंय.

Nana Patole On Balasaheb Thorat Letter : नाशिक पदवीधर मतदार संघातील विजयी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसवर केलेल्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणं आता अशक्य असल्याचं वक्तव्यच बाळासाहेब थोरातांनी केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्रच लिहिलंय. सत्यजीत तांबे प्रकरणात मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलंय. “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, बाळासाहेब थोरातांनी पत्र लिहीले नसेल, असं मला वाटतं. बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी काय पत्र लिहिलंय हे मला माहिती नाही.” यापुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघातील या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी १३ फेब्रूवारीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत योग्य चर्चा करून घरातला प्रश्न हा घरात सोडवू, असं देखील नाना पटोले म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना नाना पटोले भाजपवर टीका करण्यासाठी मात्र विसरले नाहीत. “भाजपने जे खड्डे खोदलेत त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील” अशा इशारच नाना पटोले यांनी दिला.

त्यामुळे सत्यजीत तांबे-नाना पटोले नंतर आता बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहीत तक्रार केल्यानंतर आता राज्यभरात नाना पटोलेंविरोधात बंड पुकारल्यामुळे आता नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे.