घरमुंबई...मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन; राज ठाकरेंनी वाहिली लता दीदींना आदरांजली

…मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन; राज ठाकरेंनी वाहिली लता दीदींना आदरांजली

Subscribe

गेल्या वर्षी याच दिवशी (ता. 6 फेब्रुवारी) गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज जगभरातील त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्यासाठी एक पत्र लिहीत या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज (ता. 6 फेब्रुवारी) प्रथम स्मृतिदिन. लता मंगेशकर यांना त्यांच्या जगभरातील चाहते सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून अभिवादन करत आहेत. अनेक ठिकाणी तर लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यासाठी गाण्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट करत लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या या पत्रात लिहीले आहे की, “दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.

- Advertisement -

चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन! राज ठाकरे” असे म्हणत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा – लता दीदींवर अज्ञात व्यक्तीने केला होता विषप्रयोग

- Advertisement -

याआधी देखील राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पत्र लिहिले होते. त्या पत्रातून त्यांनी लता दीदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते. लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस केली होती. दरम्यान, राज ठाकरे यांनी “चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन.” असे आपल्या पत्रात म्हणत लता दीदींना अभिवादन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -