घरताज्या घडामोडीजन आशीर्वाद यात्रा : सेनेकडून राणेंचा खास पाहुणचार अन् काळजीही

जन आशीर्वाद यात्रा : सेनेकडून राणेंचा खास पाहुणचार अन् काळजीही

Subscribe

नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईनंतर राणेंचा दौरा हा  २३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान कोकणात आहे. कोकणातल्या या दौऱ्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली असली तरीही दुसरीकडे शिवसेनाही जोरात कामाला लागली आहे. पण नारायण राणे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेने खास काळजी घेतली आहे. नारायण राणेंच्या दौऱ्यात कोणताही सरकारी अधिकारी हजर राहणार नाही याची खबरदारी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. नारायण राणे यांचा दौरा रत्नागिरी, चिपळूण या भागात आहे. पण नारायण राणेंच्या या दोन दिवसाच्या दौऱ्याची शिवसेनेने खास तयारी केली आहे. याआधी कोकण पूरग्रस्तांच्या भेटीला आल्यावर अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर नारायण राणे चिडलेले होते. पण यंदा मात्र शिवसेनेने या दौऱ्यात अधिकारी दौऱ्यासाठी फिरकणार नाहीत याचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शिवसेनेने केला आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या मुंबई दौऱ्यासाठी लागलेले शुभेच्छांचे बॅनरही मुंबई महापालिकेकडून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतही नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना चांगलीच फिल्डिंग लावून आहे.

परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची बैठक लावली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या दौऱ्यात एकही अधिकारी हजर राहणार नाही याची पुरेपूर काळजी शिवसेनेने घेतली आहे. नारायण राणे २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. चिपळूण, संगमेश्वर असा नारायण राणेंचा दौरा असणार आहे. पण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीने नारायण राणे यांना डिवचण्याचे काम शिवसेनेने केले आहे. याआधी पूरग्रस्तांना भेटीच्या दौऱ्यात नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. एकही अधिकारी हजर नसल्याने नारायण राणेंना अनावर झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री गेला उडत अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच अधिकाऱ्यांनाही गैरहजेरीबाबत जाब विचारला होता.

- Advertisement -

मुंबईतही बॅनर काढले

नारायण राणे १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबईतील मराठमोळ्या वस्तीत तसेच दक्षिण मुंबईपासून ते पूर्व आणि पश्चिम उपनगरात नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा कार्यक्रम आहे. पण या दौऱ्यासाठी लागलेल्या शुभेच्छांच्या बॅनर्सची शहरात गर्दी झाली आहे. मुंबई महापालिकेकडून हे बॅनर्स आज सकाळी काढून टाकण्यात आले. त्यामुळे मुंबईतल्या दौऱ्यावरही शिवसेनेने विशेष काळजी घेतली आहे. नारायण राणे हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. यावरूनही शिवसेनेने राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंना शिवसेनेने जागा दाखवून दिली आहे. त्यांचा धसका घेण्याची काहीही गरज नसल्याचेही शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


हे ही वाचा – नारायण राणेंचे सिंधुदुर्गासाठी २००कोटी, तालुके जोडणार मिनीट्रेनने

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -