घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम पित्याला १० वर्षाचा कारावास

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम पित्याला १० वर्षाचा कारावास

Subscribe

अकोले : तालुक्यातील शिरपुंजे येथील एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या नराधम पित्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी राजूर पोलिसांत नराधम बापावर बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल लागून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी आरोपीस दहा वर्षांच्या कारावासासह ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

असा घडला प्रकार

अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथे रहिवासी असलेल्या एक कुटुंबातील इयत्ता ९ वीत शिकणार्‍या १५ वर्षाची मुलगी आहे. सन २०१६ पर्यंत आश्रमशाळेत शिक्षण घेणारी पीडित मुलगी घरी होती. जून २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात एके दिवशी या पीडितेचा बाप दारु पिऊन आला व जेवणं झाल्यावर सगळेजण झोपी गेले असताना दारूच्या नशेत या नराधम पित्याच्या मनातील सैतान जागा होऊन तो आपल्या पोटच्या मुलीजवळ जावून तिच्याशी लगट करू लागला. त्यामुळे झोपेतून जागा झालेला तो लहानसा जीव आपल्या जन्मदात्याच्या या कृत्याने भांबावला आणि तिने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र या नराधमासमोर तिचा विरोध कमी पडला. बापाने आपल्याच पोटच्या मुलीला दमबाजी करून बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यामुळे या लहानगीला प्रचंड वेदना होऊ लागल्याने ती रडू लागली. या आवाजाने जवळच झोपलेली तिची आई आणि दोन्ही भाऊ जागे झाले आणि त्यांनी विचारणा केली. तेव्हा पीडितेने बापाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगताच त्या तिघांचाही संताप झाला. मात्र, दारुने त्या नराधमाच्या डोक्यात राक्षसी वृत्ती जागी केलेली असल्याने त्याने उलट दमबाजी व शिवीगाळ करत त्या तिघांनाही धमकावले. त्यावरही न थांबता ‘जर कोणी या प्रकाराबाबत कोठे काही बोलले तर एकेकाचा मुडदा पाडील’ अशी धमकी दिली. त्यामुळे सारेच गप्प राहिले.

- Advertisement -

असा मिळाला न्याय

या घटनेतून पीडिता गर्भवती राहिली, मात्र बापाच्या धाकाने घरातील कोणीही बाहेर काही बोलण्यास धजावत नसल्याने पीडितेच्या पोटातील गर्भ सात महिन्यांचा झाला. त्यामुळे तिला वेदना होऊ लागल्याने अखेर तिच्या आई व भावांनी तिला एका खासगी डॉक्टरांकडे नेले व औषधोपचार घेतले. हा सगळा प्रकार संशयात्मक वाटल्याने संबंधित डॉक्टरांनी याबाबत त्यांना विश्वासात घेवून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते सगळेच घाबरले व तेथून निघून गेले. त्यामुळे संशय बळावलेल्या त्या डॉक्टरांनी अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेला घडला प्रकार कळविला. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच दि. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी स्नेहालय संस्थेचे हर्षदा गोले, संतोष धर्माधिकारी व अखील पठाण हे तिघे पीडितेच्या घरी आले व त्यांनी त्या कुटुुंबाला धीर देत राजूर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी राजूर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. दोन दिवस तेथे उपचार घेतल्यानंतर १५ फेबु्रवारी २०१८ रोजी सदर पीडिता आपल्या आईसह थेट राजूर पोलीस ठाण्यात पोहोचली व आपल्या नराधम पित्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी त्या नराधमास गजाआड करीत घटनेचा बारकाईने तपास करुन संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी युक्तिवाद करत न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करून १७ साक्षीदार तपासले. या खटल्यात पीडित मुलगी व तिची आई दोघेही फितूर झाले. मात्र, पीडिता गर्भवती राहिल्याने व अहमदनगर जिल्हा रुग्णलयातील तपासणीत पोटातील गर्भ तिच्या बापाचाच असल्याचे स्पष्ट झाले. या दरम्यान १२ एप्रिल २०१८ रोजी पीडितेने बाळाला जन्म दिला, मात्र बाळाची स्थिती गंभीर असल्याने २० एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केलेली असल्याने राजूरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक कादरी यांनी नगर जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मृत बाळाच्या हाडाचे नमुने शाबीत ठेवण्यास सांगितले.

त्यानुसार रुग्णालयाने बाळाच्या पायाचे हाड सुरक्षित ठेवले होते, नाशिक येथील वैद्यक प्रयोगशाळेतील तपासणीत बाळाचा आणि पीडितेच्या बापाचा डीएनए जुळाल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व पुराव्यांसह सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी उच्च न्यायालयातील विविध दाखले देत युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास, पोस्कोच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षांचा कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची कैद, कलम ५ (एन)सह ६ नुसार १० वर्ष कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावास, कलम ५ (।)(॥) श्रस ६ नुसार १० वर्ष कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय ६० हजार दंडातील ४० हजार रुपये पीडितेला व २० हजार रुपये सरकारजमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारी अभियोक्ता म्हणून कोल्हे यांनी कामकाज पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार सुनील सरोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे व कोर्ट ऑर्डली सारीका डोंगरे यांनी सहाय्य केले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -