घरताज्या घडामोडीनाशिकमधील पंडीतनगर, नवश्या गणपती परिसर सील

नाशिकमधील पंडीतनगर, नवश्या गणपती परिसर सील

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी (दि.१४) नाशिक शहरात दोन नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सिडकोतील पंडीतनगर (मोरवाडी) आणि आनंदवली येथील नवश्या गणपती परिसर महापालिकेतर्फे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. शहरात सद्यस्थितीत एकूण २३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. गुरुवारपर्यंत २४ प्रतिबंधित क्षेत्र होते. परंतू याच दिवशी तीन प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बध हटविण्यात आले आहेत. तर, नवीन दोन प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ झाली आहे.

नाशिक शहरात ४१ करोनाबाधित रुग्ण आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे रुग्ण वास्तव्य करत असलेला सिडकोतील पंडीतनगर व आनंदवली येथील नवश्या गणपती परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही. परिसरातील व्यक्तींना घर सोडून बाहेर जाता येणार नाही. महापालिकेतर्फे व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेवून साथरोग सर्व्हेक्षणमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील नातलग व नातेवाईकांचा शोध घेतला जाणार आहे.

- Advertisement -

पंडीतनगरमधील रुग्ण टॅक्सीचालक

नाशिक शहरातील मोरवाडी येथील पंडितनगरमधील 35 वर्षीय टॅक्सीचालक करोनाबाधित आढळून आला आहे. काही दिवसांपुर्वी करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाच्या संपर्कातील नातलग व नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नवश्या गणपती परिसरात महिला करोनाबाधित

आनंदवली येथील नवश्या गणपती परिसरातील प्रसुती झालेली महिला करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेची प्रसुती काही दिवसांपुर्वी खासगी रुग्णालयात झाली आहे. महिलेस करोनाबाधित लक्षणे आढळून आल्याचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असता ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

- Advertisement -

तीन क्षेत्रातील निर्बध हटले

धोंगडेमळा-नाशिकरोड, वृंदावननगर-म्हसरुळ, संजीवनगर-सातपूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. या परिसरात रुग्ण करोनाबाधित आढळून आल्यानंतर महापालिकेने १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. त्यानुसार सदर क्षेत्राचा १४ दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्याने निर्बंध हटविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -