स्थायीतील आठ सदस्यांच्या २६ ला नियुक्त्या

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीचा कायदेशीर खल अखेर थांबला असून येत्या २६ फेब्रुवारीला केवळ एकच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्यावर्षी पक्षीय तौलानिक संख्याबळानुसार सदस्य नियुक्त करताना शिवसेनेचा एक सदस्य कमी नियुक्त केला होता. यासंदर्भात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर गेल्याच महिन्यात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र सत्तारुढ गट आणि प्रशासनाने यासंदर्भात वकिलांची मते मागविले. त्यात दोन वकिलांकडून भिन्न मते प्राप्त झाल्याने संभ्रम होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार हे दोन्ही वकीलांचे मत असल्याने महासभा घेण्याचे ठरले. १८ फेब्रुवारीला महासभा होईल. त्यानंतर सदस्य नियुक्तीसाठी २६ फेब्रुवारीस विशेष महासभा होईल.