घरमहाराष्ट्रनाशिकसातोटे हत्याकांडातील निर्दोषींना ३० लाखांची भरपाई

सातोटे हत्याकांडातील निर्दोषींना ३० लाखांची भरपाई

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारकडून अंमलबजावणी

नाशिक न्यायालयाच्या आदेशानुसार सातोटे हत्याकांडातील निर्दोष सहा जणांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य गृह विभागाने रक्कम देण्याचा शासननिर्णय निर्गमित केला आहे.

बेलतगव्हाण (जि.नाशिक) येथे ५ जून २००२ ला दरोडा, दोन महिलांवर अत्याचार व चारजणांची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध पुरावे जमा केले होते. तसेच हे कृत्य आरोपींनीच केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. सुनावणीअंती सहा आरोपींना दोषी ठरवून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात आली. नाशिक जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने तीन आरोपींना फाशीची शिक्षा व उर्वरित तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

याविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण चौकशी करत सर्व आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व सहा आरोपींना नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने प्रत्येक ५ लाख असे ३० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आरोपींमध्ये अंकुश मारूती शिंदे, राजा आप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मन शिंदे (रा. भोकरदन, जि. जालना), राजू म्हसू शिंदे, बापू आप्पा शिंदे, सुर्‍या ऊर्फ सुरेश गंगाराम शिंदे (रा. कैलासनगर, ता. भोकरदन, जि. जालना) यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य गृहविभागाने जिल्हा न्यायालयाकडे ३० लाख रुपये देण्यासाठी शासननिर्णय निर्गमित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -