कृषी मंत्री दादा भुसे यांची जुगार अड्ड्यावर धाड

मालेगाव : तालुक्यातील झोगडे गावात काही कार्यक्रमानिमित्त आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे काही स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकला, याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोगडे गावात मागच्या दोन महिन्यापासून जुगार अड्डा सुरू होता. त्याबाबत ग्रामस्थांमध्ये संतपाची भावना होती. महिला वर्ग ही या जुगार अड्ड्यामुळे वैतागला होता. अनेक तरुण जुगार खेळू लागल्याने पालकही चिंतेत होते. अल्पावधीत येथे लाखो रुपयांची उलाढाल होत होती. पोलीस ठाणे या जुगार अड्ड्यापासून काहीच अंतरावर असूनही पोलीस प्रशासन जुगार अड्ड्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान कृषिमंत्री दादा भुसे काही कार्यक्रमासाठी गावात आले असता. ग्रामस्थांनी संधी साधत ही कैफियत त्यांच्यापुढे मांडली. भुसे यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना साथीला घेत या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. भुसे यांच्या अश्या तत्परतेमुळे गावातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.