घरमहाराष्ट्रनाशिकयजमान पळवण्यावरून नाशिकच्या गंगाघाटावर पुरोहितांत राडा

यजमान पळवण्यावरून नाशिकच्या गंगाघाटावर पुरोहितांत राडा

Subscribe

वारंवार घडणार्‍या वादाच्या घटनांमुळे धार्मिक अधिष्ठान चर्चेत

नाशिक : यजमान पळवण्याच्या वादातून पंचवटीत गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली. या घटनेमुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. दरम्यान, अशा घटनांमुळे गोदाघाटासह धार्मिक अधिष्ठान समजल्या जाणार्‍या नाशिक नगरीलाच गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरात गोदावरी नदी दक्षिण वाहिनी होते. त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे. त्यामुळे रामघाटावर राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थीविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. रामघाट रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वेतन ठरलेले आहे. मात्र, अनेकवेळा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत आहेत. तसाच प्रकार सोमवारी (दि.१४) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. दोन पुरोहितांमध्ये मोठमोठ्या आवाजात झालेल्या भांडणामुळे गंगाघाटावर विधीसाठी आलेल्या भाविकांची गर्दी जमा झाली. जवळपास अर्धातास हे भांडण सुरू होते. त्यामुळे धार्मिक विधी खोळंबले. दरम्यान, अशा घटनांमुळे परिसरातील धार्मिक वातावरण दूषित होत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरमध्ये धारदार शस्त्राने हल्ला

त्र्यंबकश्वरमध्येही यजमान पळवण्यावरून नेहमीच वाद होत असतात. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिन्यांपूर्वी पुरोहितांमध्ये राडा झाला. वादाचे पर्यावसन नाशिकमधील हिरावाडी परिसरात एकमेकांवर धारदार शस्त्र व घातक शस्त्राने वार करण्यापर्यंत मजल गेली होती. या घटनेमुळे देशभरातून येणार्‍या भाविकांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पुरोहितांना अटक केली होती.

गोदाघाटावर यजमान पळवण्याच्या कारणातून कुठलाही वाद झाला नसून, काही वैयक्तिक कारणातून पुरोहितांमध्ये वाद झाला आहे. हा वाद मिटलादेखील आहे.
– सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -