घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

Subscribe

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय अर्धनग्न पायी मोर्चा मंगळवारी (दि.६) सकाळी एक्स्लो पॉईंट येथून सुरुवात झाली. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली पाहिजे, या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता. मोर्चा सुरू होताच आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करीत पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना येत्या 15 दिवसांत अंबड एमआयडीसीसाठी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दत्तनगर, चुंचाळे भागात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. खून , दरोडे, धारदार शस्त्राने हल्ले, चोरी, सोनसाखळी चोरी, लुटमार अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे चुंचाळे परिसरात पोलिसांचा धाक नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने चुंचाळे, दत्तनगर भागातील नागरिकांना अंबड पोलीस ठाण्यात येण्यासाठी किंवा हल्ल्याची घटना घडल्यास पोलिसांना चुंचाळे, दत्तनगर भागात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनासह आमदार, पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. मात्र, स्थानिक प्रशासनाने हा प्रश्न मंत्रालय दरबारी असल्याने नाशिक ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (दि.६) एक्स्लो पॉईंट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली.

- Advertisement -

मोर्चा गरवारे पॉईंटपर्यंत पोहोचल्यानंतर आमदार हिरे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदार हिरे यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्याच्या प्रश्नाविषयी चर्चेसाठी पालकमंत्री दादा भुसे व आंदोलकांची भेट घालून दिली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आमदार सीमा हिरे, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडलवार, जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्यासह आंदोलनकर्ते साहेबराव दातीर, रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे यांच्याशी चर्चा केली.
पालकमंत्री भुसे यांनी अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यासाठी गृहमंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे येत्या १५ दिवसांत अंबड एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर पायी अर्धनग्न मोर्चा स्थगित करण्यात आला.

१५ दिवसांचा अल्टीमेट

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन अंबड एमआयडीसीसाठी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. नवीन पोलीस ठाण्यासाठी मोर्चे, आंदोलन करुनसुद्धा प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास आले. अखेर नाशिक ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदार सिमा हिरे यांनी मध्यस्थी होत पालकमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणली. १५ दिवसापर्यंत नवीन पोलीस ठाणे निर्मितीसाठी कार्यवाही न झाल्यास पुन्हा पायी अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर काढला जाईल, असा इशार साहेबराव दातीर यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -