Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक शासनाचा वचक नसल्याने ठेकेदारांचे चांगभले

शासनाचा वचक नसल्याने ठेकेदारांचे चांगभले

Subscribe

नाशिक : आदिवासी बहुल भाग असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागाला जोडणार्‍या विविध रस्त्यांच्या निर्मितीतुन शाश्वत विकास व्हावा आणि दळणवळण सोयीस्कर व्हावे, यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी यांचे कडून कोटयावधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येवून देखील त्या निधीचा परिपूर्ण विनियोग संबंधित अधिकारी आणि कामाचा ठेका घेतलेले ठेकेदाराकड़ून होत नसल्याने अनेक रस्त्यांची वाट लागली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जानोरी ते पाडळी देशमुख या सुमारे सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या प्रयत्नांनी मंजूर करून लोकार्पण झालेल्या सुमारे 271.5 लक्ष रूपयांच्या महत्वाच्या रस्त्याला तीन च वर्षात ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला हा रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गला जोडलेला हा एकमेव रस्ता तीनच वर्षात खचला असून, त्यामुळे ‘शासनाचा नाही वचक आणि ठेकेदारांचे चालले पचत’ असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

- Advertisement -

शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन ह्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीसाठीही स्वतंत्रपणे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.विशेष म्हणजे रस्त्याच्या कामानंतर देखभाल आणि दुरुस्तीसाठी रस्तानिहाय स्वतंत्रपणे वेगळ्या निधीची मंजुरी सुद्धा प्राप्त झाली होती. तरीही गेल्या तीन वर्षात या ठिकाणी कोणतीही देखभाल किंवा दुरुस्ती केली गेली नाहीच उलट जानोरी गवाजवळ एका ठिकाणी जी काही मोरी बनवलेली होती तीचे काम देखील अर्धवट ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी एक बाजू सिमेंट काँक्रीट केली असून, दूसरी बाजू तशीच अपूर्ण ठेवली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने घसरतात. रात्री अपरात्री तर वाहने घसरून छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. विशेष म्हणजे, या मार्गावर जवळपास दोन लहान पुल, दहा मो-या आणि रस्त्याची वाढीव रुंदी दिसत नाही. या सर्व कामासाठी जवळपास पावणे तीन कोटी रूपयांचा इतका मोठा निधी मंजूर करून तो उपलब्ध होऊन देखील शासनाचे नियम व अटी संबंधित ठेकेदाराने आणि संबंधित जबाबदार अधिकार्‍यांनी पायदळी तुडविल्या असल्याचा आरोप जानोरीच्या व आसपासच्या नागरिकांनी केला आहे. शासनाच्या निधीच गैरवापर करणार्‍या सर्वांवर कायदेशीर कारवाई राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी याबाबतचा पत्रव्यवहार जागरूक नागरिक करणार आहेत. त्यातून मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जानोरी ते पाडळी देशमुख हा रस्ता जवळपास सुमारे १० वर्षांपासून दयनीय व वाहतुकी योग्य नसलेला रस्ता म्हणून ओळखला जात होता. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन या रस्त्याला मुहूर्त लाभला.

मात्र आता वेळीच दुरुस्ती व देखभाल जर झाली नाही तर भविष्यात वाहनचालक व मुख्य दळणवळनाची मोठी ग़ैरसोय होणार आहे. सध्या अस्वली स्टेशनकडे जाणारी वाहतूक पुलाच्या प्रलंबित कामामुळे ठप्प आहे. गेल्या तीन महिन्यांपासुन मुंढेगाव-अस्वली-भगुर राज्यमार्ग बंद आहे. त्यात मुंढेगाव ते बांडेवाडी पर्यंत रस्ता वाहतुकियोग्य रहिलेला नाही. मग जर घोटी कड़े तसेच गोंदे, वाडीवर्‍हे किंवा नाशिक जायचे असेल तर एकमेव जानोरी-पाडळी रस्त्याने नागरिकांना जावे लागत आहे. शिवाय याच रस्त्यावर पाडळी गावाजवळ सिद्धिविनायकाचे प्रचलित मोठे मंदिर असुन या ठिकाणी भाविकांची कायम वर्दळ सुरु असते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या काळात हा रस्ता दिवस,रात्र कायम गजबजलेला असतो. या सर्व बाबी प्रशासनाने लक्षात घ्यायला हव्या. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी या रस्त्याच्या बाजूने जानोरी गाव ते सिद्धिविनायक मंदिर पर्यंत एखाद्या विशेष योजनेतून दिवाबत्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

स्थानिक नागरिक म्हणतात…

- Advertisement -

रस्ते दुरुस्तीसाठी माजी आमदार निर्मला गावित यांनी भरीव आर्थिक तरतूद केली होती. तरीही दर्जेदार काम झालेले नाही. पावसामुळे या रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे. तर काही नागरिक माहितीचा अधिकार देवून प्रत्यक्ष कामाची माहिती मागवणार आहेत. अधिकारी व ठेकेदार यांनी हा रस्ता तात्काळ दुरुस्तीसाठी घ्यावा आणि अर्धवट कामे पूर्ण करावेत अशी मागणी पंचायत समिती माजी सभापती सोमनाथ जोशी, सरपंच अर्जुन भोर, इगतपुरी तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम भोर, सोसायटी चेअरमन दत्तू भोर ,एकनाथ भोर, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, सिद्धिविनायक ट्रस्टचे संजय तुपसाखरे, रेल्वे कर्मचारी ज्ञानेश्वर यंदे, सोमनाथ पवार, रवींद्र रहाड़े, श्याम पवार, कृष्णा कोकणे, कचरू भोर, अक्षय सोनवणे, माजी सरपंच सुरेश कोकणे आदिंनी केली आहे.

- Advertisment -