घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र४ किमी पायपीट करत जिल्हाधिकारी थेट पाड्यावर; 'तिथे' योजना पोहचतात का?

४ किमी पायपीट करत जिल्हाधिकारी थेट पाड्यावर; ‘तिथे’ योजना पोहचतात का?

Subscribe

नाशिक : नव्यानेच पदभार स्वीकारल्यानंतर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी येथे शुक्रवारी (दि. ४) भेट दिली. या वाडीला रस्ता नसुन फक्त पायवाट आहे. त्यातच पाऊस असल्याने या भागात ओढे, नाले दुथडी भरून वाहत असुन डोंगरावरून प्रचंड धबधबे देखील कोसळत आहे. त्यातच पायवाटेचा निसरडा रस्ता… काय तो निसर्ग… काय ती डोंगरं आणि दर्‍या…. मोठमोठे खाचखळगे, दगडं, चिक्खल…अन ओढे, नाले, जंगल असा ३ ते ४ किलोमीटरचा थरारक पायी प्रवास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी करून खैरेेेेवाडी गाठले. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यासह सोबत असणार्‍या सर्वच शासकीय अधिकार्‍यांना खैरेवाडीचा प्रवास प्रथमच घडला. आदिवासी पाड्यावर जाणारे नजीकच्या काळातील जलज शर्मा हे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले आहे.

यानिमित्ताने ह्या भागातील आदिवासी नागरिकांच्या व्यथा आणि जन्मोजन्मीच्या दुखण्याची माहिती अधिकार्‍यांनी जाणून घेतली. ह्या वाडीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून पक्का रस्ता आणि विविध शासकीय योजनांचा फायदा होणार आहे. नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायत हद्धीतील खैरेवाडी ही अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल आदिवासी वाडी निवडली. या वाडीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडीकडे जाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतर स्वतः जंगलातून पायपीट करत पार पाडले. तीन ते चार ओढे व नाल्यांच्या पाण्यातून वाहणार्‍या प्रवाहातून मार्गक्रमण करीत खैरेवाडी गाठले.

- Advertisement -

या पाहणी दौर्‍याप्रसंगी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते. खैरेवाडी येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. वाडीतील आदिवासी ग्रामस्थ आणि जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे या वाडीवर जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात होणार्‍या पाणीटंचाईसाठी उपाययोजना करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी हितगुज साधून समस्या व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. येथील लोकांकडून आणि अधिकार्‍यांकडून संजय गांधी योजना, शिधापत्रिका, आधार कार्ड, शेततळे, शैक्षणिक योजना, आदिवासी विकास योजना, घरकूल योजना, इतर विभागांच्या योजना असा सविस्तर आढावा घेण्यात आला. अतिदुर्गम भागातील या खैरेवाडीच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून नियोजन करण्यात आले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी देणार पुन्हा भेट

काम सुरु झाल्यानंतर दोन तीन महिन्यांनी कामाची पाहणी करण्यासाठी पुन्हा भेट देण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला. तर आजवर आदिवासी पाड्यावर न जाणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक झाली. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी या तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी बांधव अतिदुर्गम भागात सोयीसुविधां अभावी रहात आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रामीण भागातील समस्या जैसे थे राहतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील पाड्यांना भेट द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -