घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच करा बरखास्त

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच करा बरखास्त

Subscribe

महापालिकेचे काँग्रेस गटनेते शाहू खैरे, नगरसेवक गुरूमित बग्गा यांची पत्रकार परिषदेत मागणी

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या कामांसाठी ६० टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आल्या. एकीकडे करवाढीतून नागरिकांची पिळवणूक व दुसरीकडे कमी महत्त्वाच्या कामांच्या हट्टापायी कर्जबाजारीपणा असा आतबट्ट्याचा व्यवहार महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेस गटनेते नगरसेवक शाहू खैरे, नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी पत्रकार परिषदेत केली.

नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. याकरीता १,०८४ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून ९४० कोटी रुपये अनुदान मिळणार असले तरी महापालिकेचा हिस्सा आणि अतिरिक्त खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे. त्यातच आता नाशिक शहरातील गावठाण विकासासाठी ६० टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे या योजनेसाठी ३०४ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार मनपाला सोसावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटी कामातील प्रत्येक निविदा ही जादा दराने आल्याने याचा आर्थिक ताण हा महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. त्यामुळे ही जादा दरवाढ कोणाच्या भल्यासाठी असा आरोप करत महापालिकेला कर्जबाजारी करू नका, असे सांगत आता ही कंपनीच बरखास्त करण्याची मागणी खैरे आणि बग्गा यांनी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेमार्फत कोणती कामे घेतली पाहिजेत याचाही कोणत्याही प्रकारचा धारबंद प्रशासनास नाही. यामध्ये शासनाचा आणि महानगरपालिकेचा एवढा मोठा पैसा खर्च करण्याची गरज होती का हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. फुगवलेले इस्टिमेट, चुकीच्या पद्धतीने होणारा पैशाचा विनियोग या बाबी स्मार्ट सिटीअंतर्गत होणार्‍या व्यवहारांमध्ये दुर्लक्षित करून चालणार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

स्मार्ट कामांची चौकशी करा : डॉ. हेमलता पाटील

ज्या गोष्टी शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तिच कामे स्मार्ट सिटीअंतर्गत घेतली गेली पाहिजेत, परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या एकंदर कामकाजाची चौकशी करण्याची वेळ आता आलेली आहे. ही योजना जर भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकली तर महानगरपालिका कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत येणार्‍या कामांची चौकशी करण्यासंदर्भात थेट पंतप्रधानांकडे मी पत्रव्यवहार करणार आहे आणि शासनाच्या ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ या आश्वासनाचे काय झाले अशी विचारणादेखील करणार आहे. त्याचप्रमाणे येत्या महासभेत स्मार्ट सिटीचा कारभार नक्की कोणत्या दिशेने चाललेला आहे आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती पैसा खर्च झालेला आहे, यासंदर्भात जाब विचारणार असल्याचे काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -