घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसारथीच्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका

सारथीच्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका

Subscribe

स्वराज्य संघटनेचे करण गायकर यांचं प्रतिपादन

नाशिक : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या खासदार गोडसे यांनी मराठा समाजाच्या नावावर राजकारण करून मतांची झोळी भरण्यासाठी फुकटचे श्रेय लाटण्याचा खटाटोप बंद करावा, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते तथा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.

सारथी संस्थेला विभागीय कार्यालयासाठी शहरात सहा हजार चौरस फूट जागा शासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर या कामाचे श्रेय लाटणार्‍या बातम्या प्रसारित करून आणण्याचा प्रयत्न खा. गोडसे यांच्याकडून सुरू असल्याने मराठा समाजातील बहुसंख्य लोकसंख्येने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या कुठल्याही आंदोलनात सहभाग न नोंदवणारे, या आंदोलनाचे गुन्हे अंगावर घेतलेल्या तरुणांना वार्‍यावर सोडणारे, स्वतःवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काळजी घेणारे हे खासदार आज समाजाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा फुकाचा अट्टहास करून सारथीसारख्या संस्थेच्या जागेचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. अशा भावना समाज व्यक्त करीत आहे. या भावनांना प्राथमिक स्वरूपात वाट मोकळी करून देताना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते आणि छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनी खा. गोडसे यांच्या या श्रेयगिरीचा खरपूस समाचार घेतला.

- Advertisement -

गायकर यांनी प्रसिद्ध पत्रकातून म्हटले की, खा. गोडसेंनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये किती वेळा भूमिका मांडली ती समाजापुढे आणावी. खासदार गोडसे नाशिकमध्ये झालेल्या किती आंदोलन, उपोषणांमध्ये सहभागी होते त्याचेही पुरावे द्यावेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून किंवा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून केलेल्या आंदोलनांमध्ये किती गुन्हे दाखल आहेत हे स्पष्ट करावे.

सारथी शिक्षण संस्था ही नाशिक विभागाला मिळाली ते मराठा क्रांती मोर्चाचे यश आहे. छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे. ते कोण्या एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे यश आहे. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी अशा खोट्या बातम्या देणे खासदार गोडसेंनी थांबवावे. खासदार गोडसे यांच्या पत्राने जर असे प्रश्न सुटत असतील तर त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडून मराठा आरक्षणासाठी आक्रमक व्हावे व समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.

प्रसारमाध्यमांना खासदार गोडसे यांनी जी माहिती दिली त्यासंदर्भात मी खासदार गोडसेंना सांगू इच्छितो की, समाजाने अनेकवेळा मंत्रालयात जाऊन या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजेंनी स्वतः तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करून ही मागणी राज्य सरकारला पूर्ण करण्यास भाग पाडलेले आहे. याचाही विसर कदाचित खासदार गोडसेंना पडलेला दिसतो. फक्त निवडणुका आल्या की समाजाची आठवण त्यांना होत असते. इतरवेळी मात्र सोयीनुसार ते आपले राजकारण करत असतात. निवडणुकी वेळी मी मराठा समाजासाठी खूपकाही करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न यातून दिसतो आहे. : करण गायकर, प्रवक्ता, स्वराज्य संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -