घरमहाराष्ट्रनाशिकवेतन थकल्याने बसस्थानक, गाड्यांची स्वच्छता थांबली

वेतन थकल्याने बसस्थानक, गाड्यांची स्वच्छता थांबली

Subscribe

खासगी स्वच्छता कर्मचार्‍यांचा साफसफाईला नकार

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील डेपो, बसस्थानक आणि गाड्यांमध्ये करण्यात येणार्‍या स्वच्छता कामातील कंत्राटी कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने, या कामगारांनी स्थानके,गाडयांची झोडलोट आणि गाड्या धुण्याचे काम करण्यास नकार दिलेला आहे. एसटीचे उत्पन्न घटल्याने आणि मध्यवर्ती कार्यालयाकडून अर्थसहाय्य झाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे एसटीच्या अधिकार्‍यांनी माहिती देताना सांगितले.

नाशिक विभागात एसटीच्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत 13 डेपोंमध्ये आणि सुमारे 29 बसस्थानकांवर खासगी संस्थेचे सुमारे 250 कंत्राटी सफाई कामगार तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहे. हे काम त्यांना देताना एसटीने आपले स्वच्छता कर्मचारी इत विविध विभागात वर्ग करून सफाई कामाचे खासगीकरण केलेले आहे. एसटीच्या सुमारे 900 गाड्यांची झाडलोट आणि त्या धुण्याचे काम त्याचबरोबर बसस्थानकांवर केरकचरा काढण्याचे काम खासगी कामगारांना करावे लागते. एसटीला या कामापोटी दर महिन्याला सुमारे 55 लाख रुपयांचा मोबदला खासगी संस्थेला आदा करावा लागतो. पण जुन, जुलै महिन्यापासून या कामगारांना संबंधीत कंत्राटदाराने वेतनच दिलेले नाही. तर वेतन देण्यासाठी एसटीने पेमेंटच केले नाही, असे मक्तेदारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या दोन्ही घटकांच्या मध्ये कामगार भरडले गेल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एसटीच्या बसगाड्या, डेपो आणि बसस्थानकांवर साडलोट, परिसर स्वच्छता, गाड्यांची धुलाई, डेपो कार्यालयात परिसरातील स्वच्छता आणि कार्यशाळांमधील घाण उचण्याचे काम थांबलेले आहे.

आज नाशिक डेपो एक, विभागीय नियंत्रक कार्यालय परिसर, महामार्ग बसस्थानक, जुने सीबीएस आणि ठक्कर बाजार मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील इतर डेपो, बसस्थानकांवर सफाई कामगार गैरहजर होते. त्याचबरोबर डेपोंवर गाड्यांची स्वच्छता करण्यासाठीही सफाई कामगार नसल्याने गाड्या तशाच पुढे रवाना होत होत्या. तसेच गाड्या धुतल्या गेलेल्या नव्हत्या. या अस्वच्छतेमुळे प्रवाशी एसटीच्या नावाने बोटे मोडत होते.

- Advertisement -

दरम्यान एसटीच्या लेखा विभागाने 10 लाख रूपयांचा धनादेश दिल्याचे सांगून सफाई कंत्राटदाराला कामावर मनुष्यबळ रवाना करण्याची विनंती केलेली होती. तर खासगी संस्थेनेही वरिष्ठस्तरावर अधिकार्‍यांची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तर कर्मचार्‍यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की, दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने आर्थिक तारांबळ खुपच वाढलेली आहे. त्यामुळे नाईलाजाने काम बंद करावे लागलेले आहे.

बसस्थानकांची एसटी कर्मचार्‍यांकडून सफाई

दरम्यान जुनेसीबीएस, ठक्कर बाजार मध्यवर्ती बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक येथे खासगी स्वच्छता कामगारांनी दांडी मारल्याने या ठिकाणी एसटीने आपल्या कर्मचार्‍यांना साफसफाईसाठी बोलावून घेतले होते. ते कर्मचारी दर एक-दोन तासांनी तीन्ही बसस्थानकांवर धावपळ करून स्वच्छता करताना दिसत होेते. मात्र, तरीही बसस्थानकांवर वर्दळीमुळे अस्वच्छता कायम होती. तर आगारांमध्ये एक-दोन कर्मचारीच काम करीत असल्याने गाड्या धुण्याचे आणि स्वच्छ करण्याचे कामही रखडलेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -