घरक्राइमबस दुर्घटनेनंतर अतिक्रमणधारकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम

बस दुर्घटनेनंतर अतिक्रमणधारकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम

Subscribe

पंचवटी : औरंगाबादरोडवरील कैलासनगर येथील हॉटेल मिर्ची जंक्शनजवळ शनिवारी (दि. ८) पहाटे झालेल्या बस दुर्घटनेनंतर दोन दिवसांनंतर महापालिका यंत्रणेला जाग आली आहे. दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतरही या चौकात कोणत्याही उपाययोजना आखण्यात न आल्याने पुन्हा एकदा वाहतूक नियोजनाचे तीन-तेरा वाजले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी मिर्ची चौफुली चौकात भेट देत पाहणी केली. त्यानुसार आता या चौकातील अतिक्रमणधारकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी औरंगाबादरोडवर बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सुन्न करणारी होती. मात्र या घटनेनंतर शहरातील बेशिस्त वाहतूक, मुख्य चौकातील अतिक्रमण, त्याचप्रमाणे ब्लॅक स्पॉटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नाशिकमध्ये येत सदरच्या घटनेची पाहणी केली. यावेळी शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करत तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. मात्र दोन दिवसांनंतरही पालिका यंत्रणेकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्ते अपघाताचा मुद्दा चर्चिला गेला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत तातडीने घटनास्थळी भेट देत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी चौकातील अतिक्रणाबाबत आयुक्तांनी दखल घेत विभागीय अधिकार्‍यांना आदेशित केले. त्यानुसार पंंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांनी परिसराला भेट दिली व अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्याचे आदेश देत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.

- Advertisement -
तर घटना टळली असती

माजी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी २० फेब्रुवारी २०२० रोजी या रस्त्यावर गतीरोधक बसविण्यात यावेत यासाठी मागणीचे पत्र नाशिक महानगरपालिका आयुक्त तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले होते. मात्र महापालिकेकडून या पत्राची दखल घेतली गेली नाही. तर त्याचवेळी याबाबत उचित कार्यवाही केली गेली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती असे माने यांनी सांगितले.

पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार घटनास्थळाजवळील चौकातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. भविष्यात अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. येत्या दोन दिवसांत बांधकाम विभागाकडून गतीरोधक टाकण्यात येणार आहे. : कैलास राभडिया, विभागीय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -