घरमहाराष्ट्रनाशिकवामनदादा कर्डकांच्या कुटुंबाची १५ वर्षांनंतरही परवड

वामनदादा कर्डकांच्या कुटुंबाची १५ वर्षांनंतरही परवड

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीसाठी झटणाऱ्या महाकवीची आज पुण्यतिथी

दिलीप कोठावदे, नवीन नाशिक

आयुष्यभर आपल्या पहाडी आवाजाने वेदना मुक्तीचे गीत गाणाऱ्या आणि आपल्या स्फूर्तीदाई काव्यरचनांनी जनसामान्यांमध्ये चेतना जागृत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या चळवळीसाठी पोषक वातावरण निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या हयातीत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर केलेले घर वामनदादा यांना जाऊन पंधरा वर्षे झाली तरीही अद्याप न मिळाल्याने या कुटुंबाच्या मागे लागलेला परवडीचा ससेमिरा आजही सुरूच असल्याने पुरोगामित्वाचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत क्लेशदायक आणि मानहानीकारक आहे.

- Advertisement -

आपल्या प्रभावी शब्द शैलीने समाजातील आर्थिक विषमतेवर कडाडून आसूड ओढणाऱ्या वामनदादांच्या निधनानंतर उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी त्यांचा दत्तक मुलगा रवींद्र कर्डक याने जून २००५ मध्ये नाशिकला रामराम ठोकत रहाता तालुक्यातील चितळी तेथे आपला संसार थाटला या काळात त्यांनी श्रीरामपूर येथील निलायम आणि राधिका लॉजवर सुरक्षारक्षक म्हणून साडेआठ वर्षे काम केले. मात्र याठिकाणीही त्यांच्या दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नाही वामन दादांचा मुलगा असल्याची माहिती समाजातील काही तथाकथित मान्यवरांना कळल्यावर त्यांनी रवींद्र हे वामनदादांचे चिरंजीव आहेत याविषयी शंका उपस्थित केली., मात्र पुरावे दाखविल्यानंतर याच मंडळींनी त्यांना तुम्ही सुरक्षारक्षकाचे काम करून दादांचे नाव खराब करीत आहात असा बेगडी प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित करून त्यांना काम करण्यास मज्जाव केला.

घडलेल्या प्रकाराने हतबल झालेल्या रवींद्र कर्डक यांनी मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी३१ डिसेंबर २९१४ रोजी पुन्हा नाशिकची वाट धरली. अंबड औद्योगिक वसाहतीतील ३ कारखान्यांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम सुरू केले याच काळात त्यांचा मुलगा वैभव यानेदेखील शिक्षणाला रामराम ठोकत नासिक मर्चंट को आप बँकेच्या सिडको शाखेत सुरक्षारक्षक म्हणून काम सुरू केले. तथापि येथेही प्रतिष्ठेच्या बुरख्याआड लपलेल्या चेहऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले त्यामुळे आपण एका स्वकर्तुत्वाने ख्यातनाम झालेल्या महाकवीच्या उदरी जन्म घेऊन मोठे पाप केले असल्याची भावना या कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार सुशीलकुमार शिंदे यांनी नासिक येथील एका कार्यक्रमात दिनांक २५ मे २००४ रोजी वामनदादा यांना सदनिकेचा ताबा देण्याची घोषणा केली. मात्र स्वमालकीच्या घरात राहण्याचे स्वप्न अधुरे ठेवत दहा दिवस आधीच म्हणजे १५ मे २००४ रोजी वामनदादांनी जगाचा निरोप घेतला.  त्यांच्या पश्चात शासनमान्य सदनिका मिळावी यासाठी रवींद्र कर्डक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, पंधरा वर्षे होऊन देखील सदनिकेचा ताबा मिळण्याचे घोडे कुठे अडले आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. १६ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी शासनाने डॉक्टर आंबेडकरांचे स्वलिखित साहित्य तसेच त्यांच्यावरील लिहिले गेलेले इतर लेखक कवींचे साहित्य संकलित करून महाकवी वामनदादा कर्डक मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा हवेतच विरली असून आजतागायत त्यावर कोणतीही निर्णय प्रक्रिया राबविली गेली नाही.

- Advertisement -

सद्यस्थितीत महाकवी वामनदादा कर्डक यांचा वारसा सांगणाऱ्या रवींद्र यांच्या परिवाराला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून स्वतः रवींद्र कर्डक हे एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहेत तर त्यांचा मुलगा वैभव हा शासकीय दाखले काढून देण्याचे काम करीत आहे मात्र तुटपुंजा उत्पन्नामुळे वाढते खर्च भागविण्यासाठी त्यांची कन्या कोमल ही शिक्षणा बरोबरच विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेत काम करत आहे.

महाकवी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वामनदादांच्या कुटुंबाची झालेली परवड पाहता दादांच्या लेखणीतून स्रवलेल्या कवितेच्या ओळी सहज ओठावर येतात…

पाणी वाढ गं,
लई नाही मागत
भर माझं इवलसं गाडगं,
पाणी वाढ गं,
काळानं केलं काळ…
जातीच विणलं जाळ,
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतय माझं बाळ,
पाज आम्हाला पाणी आज गं…

अनेक ठिकाणाहून डच्चू

मी महाकवीचा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे. मात्र, नुसत्या नावाच्या मोठेपणाने पोटाची खळगी भरत नाही. घर खर्च आणि कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करावे लागेलच. दादांना मनणारे आणि समाजबांधव किती दिवस मदत करतील? आजतागायत अनेक समाज बांधवांनी सदनिकेच्या न्यायालयीन लढाईसाठी मदतीचे शब्द दिले. मात्र कोणीही आपला शब्द पाळलेला नाही. चरितार्थासाठी अनेक ठिकाणी नोकरी केली, मात्र सुरक्षारक्षकासारख्या दर्जाहीन पदाच्या नोकरीमुळे वामनदादांचे नाव खराब होते, या कारणाने अनेक ठिकाणाहून डच्चू देण्यात आला. माझ्याच नव्हे तर मुलाच्या बाबतीतही हाच अनुभव आला.. मग आता तुम्हीच सांगा आम्ही कसे जगायचे…? – रवींद्र कर्डक, स्वामी विवेकानंद नगर, राणेनगर, नवीन नाशिक.

पदरात काहीही पडले नाही

वामन दादांना मंजूर झालेली सदनिका तयार होऊन १५ वर्षे झाली. सदनिकेचा ताबा मिळण्याची प्रक्रिया न्यायालयीन गुंताळ्यात सापडली असून आजतागायत हा गुंता सुटलेला नाही यातून मार्ग काढण्यासाठी रवींद्र कर्डक यांनी रिपाई नेते रामदास आठवले जोगेंद्र कवाडे औरंगाबादचे माझी पालक मंत्री गंगाधर गाडे शिवाजीराव ढवळे यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झीजवले. मात्र निव्वळ आश्वासना व्यतिरिक्त त्याच्या पदरात काहीही पडले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -