घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचेन्नई-सूरत महामार्गाच्या भूसंपदनात शेतकर्‍यांच्या 'या' मागणी मुळे येणार विघ्न

चेन्नई-सूरत महामार्गाच्या भूसंपदनात शेतकर्‍यांच्या ‘या’ मागणी मुळे येणार विघ्न

Subscribe

नाशिक : सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जात असून त्यासाठी ९९६ हेक्टर जमीनीचे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मात्र या महामार्गामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याने समृध्दीप्रमाणे खरेदीखताव्दारे भूसंपादन करण्यात यावे अशी मागणी नाशिक तालुक्यातील आडगाव, लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

या महामार्गासाठी सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर तालुक्यांत भूसंपादन केले जाणार आहे. यात ६९ गावांचा सामावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील अंतर हे १२२ किलोमीटर आहे. परंतु महामार्गाच्या भूसंपादनासाठी चार पट मोबदला देऊ केला आहे. नागपूर मुंबई समृध्दी महामार्गासाठी पाचपट मोबदला देण्यात आला होता. त्याच धर्तीवर खरेदी खताव्दारे जमीनीचे भूसंपादन करण्यात यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. नाशिक तालुक्यातील बागायती भाग म्हणून ओळखले जाणारे आडगाव, लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी या परिसरातील जमिनीचे होणारे मूल्यांकन, मिळणारा मोबदला या बाबी शेतकर्‍यांंना न परवडणार्‍या आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन चर्चा करताना सांगितले की, सदर भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी व प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी बाधित शेतकर्‍यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने 6 ऑक्टोबर रोजी काढलेला भूसंपादन निर्णयाबाबत मोबदला कसा देणार आहेत, याची माहिती दिली नाही, याशिवाय 3 ए नोटिफिकेशनमध्ये भारत राजपत्रामध्ये सर्व जमीन या जिरायती दाखवण्यात आलेल्या आहेत, वास्तविक हा संपूर्ण परिसर बागायती तसेच व्यावसायिक स्वरूपाचा आहे. महामार्गाला लागून सर्विस रोड, अंडर पास, शेतकर्‍यांना आजूबाजूच्या शेतात जाण्याबाबत रस्त्याची तरतूद राहणार आहे किंवा नाही, त्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही, शिवाय सांडपाणी जाण्याकरता ड्रेनेज व्यवस्था कशी असेल, हे देखील कोणालाही माहीत नाही. भूसंपादन होणार्‍या अनेक जमिनींमध्ये पोट हिस्सा, आणेवारीप्रमाणे प्रत्यक्षात जागेवर येऊन मोजणी करून द्राक्षेबागा, फळ, झाडे, इमारती, विहिरी, तळे, घर, गोठा, इलेक्ट्रॉनिक कनेक्शन पोल, बोअर, पाईप लाईन याचा स्वतंत्र खुलासा होणे अपेक्षित आहे. तसेच नुकसान भरपाई रक्कम शेतकर्‍यांंना अदा केल्याशिवाय जमिनी शासनाने कब्जात घेऊ नये, अशी मागणी शेतकर्‍यांंनी केली आहे. त्यामुळे समृध्दीप्रमाणे पाचपट मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष विनायक कांडेकर, प्रदीप कांडेकर, तानाजी जाधव, प्रभाकर कांडेकर, भरत जाधव, बाजीराव दुशिंग, दीपक कांडेकर, गणेश ढिकले, आण्णा कग, अशोक शिंदे , बहिरू जाधव, वैभव सुर्वे, भाऊसाहेब नाठे, आधीसह शेतकरी उपस्थित होते.

सुरत चेन्नई महामार्गासाठी दिला जाणारा सध्याचा दर आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाकरीता भूसंपादन कशा पध्दतीने करणार याबाबत शेतकर्‍यांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच आडगाव येथील जागृत देवस्थान मनुदेवी मंदिर, पिर मंदिर (धोंडवीर मंदिर) या मंदिराचे भूसंपादन न करता आहे त्या परिस्थितीत विकसित करण्यात यावे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय रस्त्याचे कामकाज सुरू असताना कॉन्ट्रॅक्टरच्या मशीनरीमुळे आजूबाजूच्या जमिनीतील पिकाचे नुकसान होणार आहे त्याचा मोबदला मिळावा. जमिनीचे दोन किंवा त्या पेक्षा आधिक तुकडे होण्याची शक्यता आहेत. काही तुकड्यांमध्ये 1 ते 10 गुंठे जमीन शिल्लक राहिल्यास सदर क्षेत्र कसणेसुध्दा अशक्य होईल. तेव्हा क्षेत्र शिल्लक राहिल्यास त्याची नुकसान भरपाई अदा करण्याबाबत भूसंपादन अधिकारी यांना अश्वासित करणे आवश्यक आहे. : अ‍ॅड. प्रकाश शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -