जिल्हा परिषद नाशिक येथे काम वाटपात ‘आर्थिक’ वाटाघाटी

जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसेंची लेखी तक्रार

नाशिक : जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारी सुरू असतानाच, कामवाटप समिती कामांचे वाटप करतांना आर्थिक मागणी केली जात असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी केली आहे. याबाबत वनारसे यांनी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना पत्र देत कामवाटप समितीमध्ये समाविष्ट असलेल्या कामांच्या शिफारशी रद्द करण्याची मागणी केली आहे.

बांधकाम तीन कार्यकारी अभियंता संबंधित उपअभियंत्यांच्या इशार्‍यावर काम करत असल्याची तक्रार ठेकेदारांच्या शिष्टमंडळाने उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांच्याकडे केली होती. दुसरीकडे बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांबाबतही तक्रारी सुरू झाल्या आहे. शिफारशी दिल्या जात नसल्याच्या तक्रारी ठेकेदारांसह सदस्यांनी केल्या. ही ओरड सुरू असतानाच बांदकाम समितीचे सदस्य वनारसे यांनी काम वाटप झाल्यानंतर शिफारस पत्र देणेबाबत मोठया प्रमाणात आर्थिक स्वरुपाची मागणी केली जाते अशी तक्रारी बहुतांश सुशिक्षित बेरोजगार, ठेकेदार यांनी माझ्याकडे केली असून, याबाबत माहिती मिळावी अशी मागणी गुंडे यांच्याकडे केली आहे.

याशिवाय झेडपीच्या विविध विकास कामांबाबत कामवाटप समितीमध्ये समाविष्ट असलेल्या कामांची शिफारस ही कामवाटप समितीची सभा झाल्यानंतर किती दिवसात शिफारस पत्र संबंधित ठेकेदार यांना निर्गमित करणे अपेक्षित आहे. तसेच संबंधित पात्र ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुबेअ) यांना विलंबाने शिफारस पत्र देण्यामागे काय कारण आहे, याबाबत देखील लेखी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.